कल्याण-डोंबिवलीतील सुस्त आरटीओ आणि ढिम्म वाहतूक पोलिसांमुळेच रिक्षाचालक मुजोर झाले असून आपणच निर्माण केलेला हा भस्मासुर आता डोईजड झाला आहे. त्यामुळे आता तरी मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधातील ‘पाटीलकी’ आणि प्रवाशांसाठीची ‘परोपकारी’ वृत्ती पाहायला मिळावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
लोकसत्ता-ठाणे वृत्तान्तने गेल्या काही दिवसांपासून रिक्षामीटरसक्ती आणि मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात सातत्याने आवाज उठविल्यामुळे आरटीओ आणि वाहतूक पोलीस खडबडून जागे झाले आहेत.
‘आम्ही कायदा/नियम मानत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा’ असा मग्रुरपणा अपवाद वगळता बहुतांश रिक्षाचालकांध्ये अजूनही दिसत आहे. आरटीओ व वाहतूक पोलिसांचा इतक्या वर्षांचा सुस्तपणा व ढिम्मपणाच याला कारणीभूत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या रिक्षाचालकांवर रिक्षा संघटनेच्या नेत्यांचा धाक किंवा आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचा नसलेला वचक तसेच इतकी वर्षे या सर्वाचे एकमेकांशी असलेले ‘अर्थ’पूर्ण संबंध यामुळेच रिक्षाचालकांची मनमानी सुरू राहिली. त्यामुळे आता कठोर कारवाई करणे जड जात आहे. मीटरनुसार भाडे न आकारणे, जवळचे भाडे नाकारणे, डोंबिवलीत पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपूलावरून जाताना मन मानेल तसे पैसे उकळणे, प्रवाशांशी अरेरावीने वागणे, रिक्षातळ सोडून रेल्वे स्थानक परिसर तसेच अन्यत्र बेशिस्तीने रिक्षा उभ्या करून वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा आणणे, एका वेळी रिक्षात चार ते पाच प्रवासी बसविणे, परवाना नसतानाही रिक्षा चालवणे अशा अनेक गोष्टी कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालक आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून इतकी वर्षे करत होते, आजही करत आहेत. या सर्व तक्रारींच्या विरोधात आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी त्या त्या वेळी कठोर भूमिका घेतली नाही. तसे झाले असते आणि मुजोर रिक्षाचालकांना तेव्हाच कायद्याचा हिसका दाखवून त्यांच्या मुसक्या आवळल्या असत्या तर आज कदाचित कल्याण-डोंबिवलीतील चित्र वेगळे दिसले असते. येथील रिक्षासंघटनाही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्याच हातात असल्याने त्यांचीही मुजोर रिक्षाचालकांवर ‘कृपा’ होती. आपल्याला कोणी काही करू शकत नाही, असा मुजोरपणा त्यांच्या अंगात भिनला. आता उशिरा का होईना, पण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे आणि त्यांचे सहकारी यांनी रस्त्यावर उतरून मुजोर रिक्षाचालकांना वठणीवर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र हे यापूर्वीच व्हायला हवे होते, तसेच रिक्षाचालकांनी मीटरडाऊन करेपर्यंत ही कारवाई अशीच सुरू राहावी, अशी प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त करण्यात येत आहे.