मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केलेली शिष्टाई सफल होऊन रिक्षांचा ई-मीटरचा प्रश्न मार्गी लागला. ई-मीटर बसवण्यासाठी लागणाऱ्या निधीपैकी ४१ लाख रुपयांचा निधी एका दिवसात जमा झाला असून ३ हजार रिक्षांना जूनपर्यंत त्याची जोडणी केली जाणार आहे. या निर्णयाची घोषणा केल्यानंतर रिक्षा संघर्ष समितीचे नेते बाबा इंदुलकर, राजू जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना रिक्षाचालकांनी खांद्यावर घेऊन बसस्थानक परिसरात मिरवणूक काढली. दरम्यान ४ मार्चपासून सुरू झालेला रिक्षाचालकांचा बेमुदत बंद मंगळवारी दुपारी संपला आणि अकरा दिवसांनंतर रिक्षांची चाके पुन्हा धावू लागली.
कराड येथे आज मुख्यमंत्री चव्हाण यांची रिक्षा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.  चव्हाण यांनी ई-मीटर बसविणाऱ्या ११ कंपन्यांशी संपर्क साधला. या कंपन्यांनी २७०० रुपये किमतीचे ई-मीटर २ हजार रुपयास देण्याची तयारी दर्शवली. कोल्हापूर शहरात ई-मीटर नसलेल्या ३ हजार रिक्षांसाठी ई-मीटर बसवण्याची सोय केली जाणार आहे. त्यासाठी ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याकरिता राजकीय पक्ष, नेते, सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांनी निधी द्यावा, अशी सूचना  चव्हाण यांनी केली आहे.    
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला प्रतिसाद देत मंगळवारी पहिल्याच दिवशी ४१ लाख रुपयांचा निधी जमा झाला. त्यामध्ये आमदार महादेवराव महाडिक १० लाख रुपये, प्रतापसिंह जाधव ५ लाख, माजी आमदार पी. एन. पाटील, छत्रपती मालोजीराजे आदी काँग्रेसजन १५ लाख, युतीचे आमदार चंद्रकांत पाटील, चंद्रदीप नरके ५ लाख, विविध सामाजिक संस्था ५ लाख, बाबा इंदुलकर व दिलीप देसाई प्रत्येकी ५० हजार आदींचा यामध्ये समावेश आहे.
पत्रकारांशी बोलताना इंदुलकर म्हणाले, अवैध प्रवासी वाहतूक रोखणे, पेट्रोल दरवाढीप्रमाणे रिक्षाभाडेवाढ करणे, गरजूंना परमीट वाटणे, रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ सुरू करणे, गॅस स्टेशन सुरू होण्यासाठी पाठपुरावा करणे आदी मागण्या प्रादेशिक परिवहन अधिकारी एस. डी. अटोळे यांनी मान्य केल्या आहेत. विजय देवणे यांनी रिक्षाचालकांच्या एकजुटीचा विजय झाल्याचे सांगितले. धनंजय महाडिक यांनी ई-मीटर बसवण्यासाठी रिक्षाचालकांनी आपले नावे संघटनेकडे द्यावीत, असे आवाहन करून कमी पडणारा निधी देण्याची तयारी दर्शवली.
दरम्यान, रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सोमवारी रात्री चव्हाण यांच्या विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, आमदार तावडे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांनी चर्चा केली. गृहराज्यमंत्री सतेज पाटील या वेळी उपस्थित होते. रिक्षाचालकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले होते.

Story img Loader