कल्याण स्थानकात पहिला सरकता जिना बसविताना केलेल्या चुका सुधारून दुसरा सरकता जिना लोकांची खरी गरज लक्षात घेऊन बसवला जाईल, ही अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली आहे. कोणत्याही प्रकारचे जनमत, उपयुक्तता आणि गरज
लक्षात न घेता रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा चुकांची पुनरावृत्ती करत दुसरा सरकता जिना कसारा बाजूच्या दुसऱ्या जुन्या पुलाला बसवण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे सर्वात वर्दळीचा असलेला आणि लोकांची खरी गरज असलेला नवा रुंद पूल मात्र सरकत्या जिन्याशिवाय चढण्याची कसरत प्रवाशांना करावी लागणार आहे.
कल्याण स्थानकात एकूण तीन मोठे पूल असून दोन फलाट जोडणारा एक छोटा अरुंद पूलही या स्थानकात आहे. या स्थानकातून दिवसाला सुमारे अडीच लाख प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी सर्वात जास्त प्रवासी नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाचा वापर करत असून अन्य छोटय़ा पुलांचा वापर हा मर्यादित स्वरूपात केला जातो. रेल्वे प्रशासनाच्या आकडेवारीनुसार दिवसाला सुमारे ८० हजार प्रवासी नव्या पुलाचा वापर करतात तर अन्य दोन जुन्या पुलांवरून ३० ते ४० हजार प्रवास ये-जा करतात. नव्या पुलावरील प्रवाशांची संख्या, त्याची उंची आणि जेष्ठांना चढण्यासाठी इतर व्यवस्था लक्षात घेता तिथे सरकते जिने बसवण्याचा प्राधान्याने विचार करण्याची गरज होती. मात्र रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करीत जुन्या पुलांना सरकते जिने बसवण्यास प्राधान्य दिले आहे. पहिल्या सरकत्या जिन्यांच्या चुकीनंतर प्रवासी संघटनांनी टीकेची झोड उठवून रेल्वे प्रशासनास आपला असंतोष दर्शवला होता. मात्र या टीकेनंतर चुकीची दुरुस्ती करण्याऐवजी पुन्हा दुसरा जिनाही जुन्या पुलास जोडण्याचा संतापजनक प्रकार रेल्वे प्रशासनाने केला आहे.
रेल्वेचे निर्णय अशास्त्रीय..
कल्याण स्थानकातील नवा पूल हा स्थानकातील सर्वात उंच पूल असून तो चढणे प्रवाशांना जिकिरीचे जाते. शिवाय त्यावर अपंग व्यक्तींसाठी सरकती खुर्ची चढू शकेल असा रॅम्पही नाही. त्यामुळे या उंच पुलावर चढण्यासाठी या ठिकाणी सरकता जिना बसवणे सुसंगत ठरले असते. नवा पूल पुरेसा रुंद, प्रवाशांना चालण्यासाठी सुयोग्य आणि इतर पुलांच्या तुलनेत सर्वाधिक वापर असलेला आहे. अशा वेळी रेल्वेने हा अशास्त्रीय पद्धतीने घेतलेल्या निर्णयामुळे रेल्वेने चुकीची पुनरावृत्तीच केली आहे असे म्हणावे लागले. उद्घाटनास धावणारे लोकप्रतिनिधी मात्र अशा वेळी पुढे येणे टाळतात हे दुर्दैवी आहे.
मधू कोटीयन, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ
प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका!
तिकीट दरवाढ करून जनतेच्या खिशातले पैसे घेऊन सुविधा देताना मात्र प्रवाशांच्या सूचनांचा जराही विचार रेल्वे प्रशासन करत नाही. त्यामुळे सतत नवनवीन चुका निस्तरण्याची वेळ प्रवाशांवर येते. रेल्वेने प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा तीव्र अंदोलन करून रेल्वेच्या या चुकांचा जाब विचारल्याशिवाय प्रवासी संघटना राहणार नाहीत. – राजेश घनघाव कल्याण-कसारा प्रवासी संघटना.
कल्याण स्थानकात चुकांचा जिना सरकताच!
कल्याण स्थानकात पहिला सरकता जिना बसविताना केलेल्या चुका सुधारून दुसरा सरकता जिना लोकांची खरी गरज लक्षात घेऊन बसवला जाईल
First published on: 08-11-2013 at 06:48 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Automatic excelletor plan fail in kalyan