इंग्रजी किंवा अन्य परकीय भाषांच्या वर्चस्वात आपल्या मातृभाषेची स्वायत्तता टिकविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भालचंद्र नेमाडे यांनी गुरुवारी दादर येथे केले.
साहित्य अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या युवा साहित्य संमेलनात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. ज्येष्ठ गुजराथी साहित्यिका धीरुबेन पटेल उद्घाटक म्हणून उपस्थित होत्या. पूर्व आणि पश्चिम भारतातील युवा साहित्यिकाचे हे संमेलन शुक्रवापर्यंत चालणार आहे.
मातृभाषेची स्वायत्तता टिकून राहिली तर त्यातून त्या भाषेचे जतन, संवर्धन आणि विकास यासाठी मोलाची मदत होणार असून भारतीय प्रादेशिक भाषांतील युवा साहित्यिकांनी याकडेही लक्ष द्यावे. पूवरेत्तर राज्यातील लोकांनी आपली भाषा टिकवून ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले असल्याचेही नेमाडे यांनी          सांगितले.
धीरुबेन पटेल म्हणाल्या की, भारतीय प्रादेशिक भाषेतील साहित्य अनुवादित होऊन दुसऱ्या भाषेत पोहोचणे आवश्यक आहे. साहित्य हा भाषा, धर्म, पंथ यांच्या भींती ओलांडून भारतीयांना साधणारा दुवा आहे.
साहित्य अकादमीचे सचिव के. श्रीनिवास राव यांनी प्रास्ताविक केले तर साहित्य अकादमीच्या मुंबई शाखेचे प्रभारी अधिकारी कृष्णा किंबहुने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
बहुभाषिक काव्य वाचन
उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या बहुभाषिक काव्यवाचनाच्या सत्रात ध्वनिल पारेख (गुजराती), अन्वेषा सिंगबाल (कोकणी), मखोन्मणी मोंगसाबा (मणिपुरी), प्रशांत धांडे (मराठी), गोकुल रसैली (नेपाळी), कैलाश शादाब (सिंधी) हे कवी सहभागी झाले होते.

Story img Loader