शहरातील एचएके हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेंतर्गत खिचडी देणे बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिवसेनेकडे तक्रार केली. शिवसैनिकांनी शालेय प्रशासनाकडे यासंदर्भात चौकशी केली असता तांदूळ शिल्लक नसल्याचे कारण देण्यात आले. परंतु शाळेतील एका खोलीत १५० किलो तांदूळ आढळून आल्याने शिवसेनेने शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
शिवसेना जिल्हा उपप्रमुख नाना शिंदे, शहर प्रमुख संतोष बळीद यांसह इतरांनी शुक्रवारी एचएके हायस्कूलमध्ये जाऊन मुख्याध्यापकांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांना शुक्रवारपासून खिचडी वाटप तांदळाअभावी बंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत येताना जेवणाचे डबे आणावेत, अशी सूचना विद्यार्थ्यांना करण्यात आली. खिचडी का बंद केली, अशी शंका उपस्थित करून विद्यार्थ्यांच्या अनेक पालकांनी शिवसेनेकडे तक्रार केली. या शाळेत पोषण आहार नियमित दिला जात असताना तांदूळ शिल्लक नसल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली असता शाळेच्या एका गोदामात १५० किलो तांदुळ आढळून आला. हा तांदुळ शिल्लक असताना खिचडी का दिली जात नाही, असा सवाल शिवसैनिकांनी केला.
याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विस्तार अधिकारी टी. के. धोंगडे यांच्याशी संपर्क साधला. धोंगडे यांनीही पाहणी केली. सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अहवाल देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, शालेय प्रशासनाने मात्र तांदुळ उपलब्ध झाला नसल्याची माहिती दिली.
डिसेंबरमध्ये तांदुळ मिळालाच नाही. याबाबत संबंधित विभागाकडे मागणी नोंदविण्यातोल्याचे शालेय प्रशासनाने सांगितले.
मात्र शाळेत तांदूळ उपलब्ध असताना खिचडी शिजवून का दिली नाही ही गंभीर बाब असून याची तातडीने दखल घ्यावी, प्रत्येक शाळेत, विद्यार्थ्यांला पोषण आहार मिळालाच पाहिजे अशी मागणी बळीद यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा