दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली आहे. शेतीत कामे नाहीत. गावोगावी लोक हाताला काम द्या, अशी मागणी करीत आहेत आणि प्रशासन काहीच करीत नाही, असा आरोप जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केला. ग्रामसेवकांनी रोजगार हमीच्या कामावर बहिष्कार टाकला. ग्रामपंचायतीत काम मागूनही मिळत नाही. नोंदणीच करून घेत नसल्याचे सदस्यांनी सांगितल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना तातडीने काम उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
जि. प.च्या शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा झाली. रोजगार हमी योजनेचा ग्रामपंचायतींनी तयार केलेल्या आराखडय़ास जि. प. सभेने मान्यता द्यावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला. कोटय़वधीचा हा आराखडा कसा मंजूर करायचा, असा प्रश्न जि.प. सदस्य पालोदकर यांनी विचारला.
रोजगार हमी योजनेतील कामे करण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे कागदावरील आकडे आणि प्रत्यक्षात होणारे काम याचा ताळमेळ घालावा, असे सदस्यांनी सांगितले. ही कामे करणे ग्रामसेवकांची जबाबदारी आहे व त्यांनीच या कामावर बहिष्कार टाकला असल्याने मजुराचे हाल होत असल्याचे सांगण्यात आले.
 ग्रामपंचायतीत मजुराने काम मागितले आणि ते नोंदविले गेले नाही तर गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांकडे कामाची मागणी करता येऊ शकते, असा खुलासा अधिकाऱ्यांनी केला. तथापि, सदस्यांनी ग्रामीण भागातील वास्तव वेगळे आहे. अनेकजण काम मागण्यासाठी येतात, पण त्यांना काम मिळत नाही. त्यामुळे सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे आणि मागेल त्याला काम उपलब्ध करून द्यावे, असे बनकर यांनी सांगितले.
 गंगापूर, वैजापूर, खुलताबाद या भागात विशेष कामे मंजूर करावी, जि. प. सदस्य संतोष जाधव यांनी केली.
सभापतींच्या निवासस्थानामुळे गदारोळ
खुलताबाद पंचायत समितीच्या सभापती शीलाबाई पवार यांचे निवासस्थान दुरुस्त करून देणे व महिला सभापतींसाठी स्वच्छतागृहांची स्वतंत्र सोय करावी, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. ती पूर्ण झाली नसल्याची तक्रार श्रीमती पवार यांनी केली आणि त्यांना साथ देत सर्वच महिला सदस्या आक्रमक झाल्या. त्यामुळे विशेष सभेत काही वेळ गदारोळाचे वातावरण निर्माण झाले.
शाळांच्या तपासणीसाठी भरारी पथके
जि. प.च्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक हजर राहात नाहीत. दांडय़ा मारणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. प्रशासन काहीच करत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावर प्राथमिक शाळांच्या तपासणी भरारी पथकांमार्फत करू, असे मुख्य कार्यकारी अधिकारी बनकर यांनी जाहीर केले.

Story img Loader