सुपर हीरो ही आबालवृद्धांना आवडणारी संकल्पना आहे. असे सगळे सुपर हीरो कुठल्याही निमित्ताने एकत्र आले तर त्यांच्या चाहत्यांसाठी ती पर्वणीच असते. हॉलीवूडच्या ‘अ‍ॅव्हेंजर्स’ या चित्रपटाने ही कमाल साधली होती. कॅप्टन अमेरिका, आयर्नमॅन, थॉर्न, हल्क अशा सगळ्या सुपर हीरोंना एकत्र आणण्याचे काम ‘अ‍ॅव्हेंजर्स’मध्ये झाले. हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. आता हीच टीम ऑस्कर सोहळ्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येत आहे.
माव्‍‌र्हल कॉमिक बुक्समधून रेखाटल्या गेलेल्या सुपर हीरोंच्या या व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत झाल्या होत्या. आयर्नमॅन, हल्क यांचे सीक्वेलपटही लोकांना भरपूर आवडले. सुपर हीरोंसाठी लोकांची असलेली आवड लक्षात घेऊन ‘अ‍ॅव्हेंजर्स’ या चित्रपटात या सुपर हीरोंना एकत्र आणण्यात आले आणि तो प्रयोगही यशस्वी झाला. आता ऑस्करच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुपर हीरो साकारणारे हे कलाकार एकत्र येणार आहेत. ऑस्कर सोहळ्यात पुरस्कार देण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. यात आयर्नमॅन साकारणाऱ्या रॉबर्ट डाऊनी ज्युनियर, हल्कची भूमिका साकारणार मार्क रफेलो, कॅप्टन अमेरिका साकारणारा ख्रिस ईव्हान्स आणि अन्य कलाकार २४ फेब्रुवारीला होणाऱ्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader