जिल्हय़ात १५ ऑगस्टपर्यंत वार्षकि सरासरीच्या ७४ टक्के पाऊस पडला असला, तरीही लातूरकरांवरील पिण्याच्या पाण्याचे संकट कायम आहे. जिल्हय़ात आतापर्यंत प्रामुख्याने भीज स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली, मात्र जलाशयात अजून पाणीसाठा नसल्याचे चित्र आहे.
जिल्हय़ाची पावसाची वार्षकि सरासरी ८०२ मिमी असून आतापर्यंत सरासरी ५९१.९ मिमी पाऊस झाला. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणात अजूनही अचल साठय़ाच्या खालीच पाणीसाठा आहे. त्यामुळे भर पावसाळय़ातही आठवडय़ातून एकवेळच्या पाण्यावरच लातूरकरांची तहान भागवली जात आहे. धनेगाव धरणातील पाणीसाठय़ात वाढ झाली. नाहीतर पावसाने सरासरी ओलांडूनही लातूरकरांवरील पाण्याचे संकट दूर होणे अवघड आहे.
अहमदपूर, चाकूर, जळकोट, देवणी व रेणापूर तालुक्यांतील पाणीसाठय़ाची स्थिती तुलनेने बरी आहे. रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी प्रकल्प भरल्यामुळे त्याचे दरवाजे उघडण्याची वेळ आली आहे. रविवारी दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. उदगीर तालुक्यातील तिरू प्रकल्पात ८३.२२, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ प्रकल्पात ६३.७० व घरणी प्रकल्पात ६६.१५ टक्के पाणीसाठा आहे. चाकूर, अहमदपूर, उदगीर येथील विहिरीची पाण्याची पातळी चांगली वाढली. ओढय़ातून पाणी खळाळत असल्याचे चित्र आहे.
गेल्या २५ ते ३० वर्षांनंतर पावसाचे दिवस या वर्षी पहिल्यांदाच वाढले आहेत. पाऊस फार झाला नसला तरी त्याचा कालावधी मोठा असल्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढले. या पावसाने शेतकऱ्यांची मात्र परीक्षा पाहिली आहे. कागदोपत्री पाऊस फार झाला नसला, तरी काही तालुक्यांत मात्र पिकांना हवा तसा पाऊस न झाल्यामुळे पिके पिवळी पडून पिकांची वाढ खुंटली. शिवाय शेतीतील आंतरमशागतीस वेळच न मिळाल्यामुळे उत्पादनातही मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. लागवडीचा खर्चही निघणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुरापास्त आहे. पीकविम्याची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढवली असली, तरी गेल्या काही वर्षांपासून विम्याच्या हप्त्याइतकी रक्कमही शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्यामुळे पीकविमा योजनेवर लोकांची नाराजी आहे. अजूनही मोठय़ा पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून आहे. जिल्हय़ात मोठे पाऊस झाले तरच पिण्याच्या पाण्याचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे.
जिल्हय़ात तालुकानिहाय पावसाची आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे- लातूर ५३४.१६, औसा ४३१.३८, रेणापूर ५९२.४२, उदगीर ६४९.२४, अहमदपूर ६९३.९६, चाकूर ६१२.४, जळकोट ६४६.५०, निलंगा ५२९.१७, देवणी ६६०.३, शिरूर अनंतपाळ ५५८.९८, सरासरी ५९१.९०.
सरासरीच्या ७५ टक्के पाऊस, तरीही पिण्याच्या पाण्याची चिंता!
जिल्हय़ात १५ ऑगस्टपर्यंत वार्षकि सरासरीच्या ७४ टक्के पाऊस पडला असला, तरीही लातूरकरांवरील पिण्याच्या पाण्याचे संकट कायम आहे. जिल्हय़ात आतापर्यंत प्रामुख्याने भीज स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली, मात्र जलाशयात अजून पाणीसाठा नसल्याचे चित्र आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-08-2013 at 01:37 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Average 75 percent rain concerned of drinking water