लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याच्या भीतीपोटी उद्घाटनाचा बार उडवून दिलेल्या नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालयाचे छोटे-मोठे काम अद्यापि सुरू असून परदेशातील खुर्च्यांची प्रतीक्षा सुरू आहे.  नवीन मुख्यालयात बसण्यास उत्सुक असणाऱ्या आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी स्वत:साठी मध्यवर्ती वातानुकूल यंत्रणा सुरू करावी लागत असल्याने जुन्याच कार्यालयात बसणे पसंत केले आहे. फर्निचराचा एक भाग असणाऱ्या खुच्र्या पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचे बिल न मिळाल्याने त्याने खुर्च्यांना पोर्टमध्येच ठेवल्याचे समजते. नवी मुंबई पालिकेने १७० कोटी रुपये खर्च करून बेलापूर येथे पामबीच मार्गावर उभारलेले मुख्यालय सर्वाच्या आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे. तेथील सर्वात उंच राष्ट्रध्वज तर देशांतील सर्वोत्तम राष्ट्रध्वज मानला गेला आहे. त्यामुळे पामबीच मार्गावरून जाणाऱ्या अनेकांच्या नजरा या मुख्यालय आणि राष्ट्रध्वजाकडे वळल्याशिवाय राहात नाही. दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमेरिकेच्या व्हाइट हाऊसबरोबर या वास्तूची तुलना केली. त्यानंतर सोशल मीडियावर वाशिंग्टनच्या व्हाइट हाऊसची तुलना करणारी चित्रे फिरत होती. या व्हाइट हेडक्वॉर्टरचे काम मात्र अद्यापि पूर्ण झालेले नाही. या मुख्यालयाची उद्घाटन तारीख १ मे रोजी ठरविण्यात आली होती. तोपर्यंत काम होणार होते. खासदार डॉ. संजीव नाईक यांच्या आग्रहास्तव हे उद्घाटन १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. त्यावर आत्ताही शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. जुन्या मुख्यालयातील फाइल्स गठ्ठे बांधून ठेवण्यात आल्या आहेत. अनावश्यक फाइल्स ह्य़ा बेलापूर येथील अभिलेख कक्षात पाठविण्यात येणार आहेत. आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी या नवीन मुख्यालयात बसून काम करण्याचा प्रयत्न केला, पण सर्व अधिकारी जुन्या कार्यालयात असल्याने तेथे काम करणे शक्य नव्हते. त्यात नवीन मुख्यालयाची वातानुकूल यंत्रणा मध्यवर्ती असल्याने एक काय आणि एक हजार काय लोकांसाठी वातानुकूल यंत्रणा सुरू करणे क्रमप्राप्त होते. स्वत:साठी ही यंत्रणा सुरू  करावी लागत असल्याने आयुक्तांनी जुन्या कार्यालयात आणखी काही काळ बसणे सयुक्तिक समजले आहे. या मुख्यालयात अद्यापि खुच्र्याचा पत्ता नाही.
     जुन्या कार्यालयातील खुर्च्या ह्य़ा नवीन कार्यालयात खुज्या वाटत असल्याचे दिसून येते. त्यामुळे एकाही अधिकाऱ्याला खुर्चीची तजवीज झालेली नाही. नवीन मुख्यालयाला साजेशा असणाऱ्या या खुच्र्या परदेशातून मागविण्यात आलेल्या आहेत. फर्निचरचे बिल न दिल्याने कंत्राटदाराने ह्य़ा खुर्च्या मागविल्या नसल्याचे समजते. फर्निचरचे हे काम २२ कोटींचे आहे. खुच्र्या आल्या आहेत पण त्या पोर्टमध्ये अडकल्याचे कार्यकारी अभियंता अजय संख्ये यांनी सांगितले.