भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सोलापूरच्या भीम प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिलीप पाटील, मल्लिनाथ कलशेट्टी, श्रीकांत कसबे, गुरुबाळा तावसे, संजय धनशेट्टी व अपर्णा कांबळे यांची निवड झाली आहे. भीम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबा बाबरे यांनी या पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेत केली.
सामाजिक, शैक्षणिक, कामगार, पत्रकारिता आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे यंदाचे अकरावे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्था संचालित रावजी सखाराम प्रशालेचे प्राचार्य दिलीप पाटील यांना शैक्षणिक क्षेत्रातील सेवेसाठी विशेष गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अभियंता संजय धनशेट्टी यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. धनशेट्टी हे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च भागवितात. किल्लारी व सास्तूर येथील भूकंपाच्या वेळी त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली. सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच पाणी पुरवठय़ाचा शंभर टक्के खर्च होण्यात धनशेट्टी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. याशिवाय गुरुबाळा तावसे (शिक्षण), मल्लिनाथ कलशेट्टी (सामाजिक कार्य), अपर्णा गंगाधर कांबळे (कामगार) व श्रीकांत कसबे (पत्रकारिता) हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या रविवारी, १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यावेळी प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, पद्मचंद्र रांका, राजेंद्र कांसवा-शहा, डॉ. उदय वैद्य, डॉ. रावसाहेब पाटील आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती बाबा बाबरे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा