दादासाहेब रूपवते फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ समतावादी विचारवंत तथा संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. यु. म. पठाण यांना समताभूषण तर ज्येष्ठ आंबेडकरवादी कृतिशील विचारवंत डॉ. मधुकर कासार यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दि. २८ फेब्रुवारी रोजी शेंडी भंडारदरा येथे होणाऱ्या धम्मयात्रेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
धम्मयात्रा समितीच्या अध्यक्षा स्नेहजा रूपवते यांनी ही माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी, दिवंगत ज्येष्ठ नेते दादासाहेब रूपवते यांच्या पुढाकाराने भंडारदरा येथे धम्मयात्रेची सुरुवात करण्यात आली. गेली ५० वर्षे सातत्याने ही वेगळय़ा स्वरूपाची धम्मयात्रा येथे भरत आहे. या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी धम्मयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात पंचशील ध्वजारोहण, पूज्य भदंत नागघोष यांची धम्मदेसना, आरोग्य शिबिर, नेत्र शिबिर, कार्यकर्ता मेळावा यांचे होणार आहे. दुपारच्या सत्रात धम्म मिरवणुकीनंतर प्रेमानंद रूपवते यांच्या अध्यक्षतेखाली धम्मसभा होईल. जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव पिचड, अशोक भांगरे प्रमुख अतिथी म्हणून या वेळी उपस्थित राहणार आहेत. याच वेळी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. ही धम्मयात्रा केवळ धम्मबांधवांसाठी नसून समाजातील परिवर्तनवादी, समतावादी विचारवंतांमध्ये वैचारिक विचारमंथन व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आली असल्याचे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.

Story img Loader