२०१२मध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या नाशिक जिमखाना या संस्थेच्या क्रीडापटूंच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी संस्थेच्या वतीने त्यांचा पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी रणजीपटू सत्यजीत बच्छाव, टेनिसमध्ये १० वर्षांआतील मुलांच्या गटात राष्ट्रीय मानांकनात ११व्या स्थानापर्यंत मजल मारणारा व राज्यात प्रथम मानांकन असलेला विक्रम मेहता, बास्केटबॉलमधील राष्ट्रीय विजेतेपद पटकावताना ४८ बास्केट करून राष्ट्रीय विक्रम करणारी जयंती दुगड, १९ वर्षांखालील कुचबिहार क्रिकेट करंडकासाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झालेला यासर शेख, महाराष्ट्राच्या टेबल टेनिस संघाकडून शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेला सव्‍‌र्हेश चंद्रात्रे व बॅडमिंटनपटू अदित्य म्हात्रे, टेनिसपटू सिद्धार्थ साबळे, कोमल नागरे, अभिषेक शुक्ल, आदित्यकुमार, जिताशा शास्त्री यांचा सन्मानचिन्ह व विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. क्रिकेट प्रशिक्षक संजय मराठे, लॉन टेनिस प्रशिक्षक राकेश पाटील, बास्केटबॉल प्रशिक्षिका स्वरांगी सहस्रबुद्धे यांचाही सन्मान करण्यात आला.
याशिवाय संस्थेच्या क्रिकेट संघाने भाऊ मालुसरे ट्वेन्टी-२० एनडीसीए लिग स्पर्धेमध्ये सलग तीन वेळेस विजेतेपद मिळविल्याबद्दल त्यांनाही सन्मानित करण्यात आले.
टेनिसमधील पायल नागरे, नील दोशी, राघव डबरी, शंभव डबरी, अमन मल्ला, रोशन पवार, कौशिक कुलकर्णी या उदयोन्मुख खेळाडूंना महाराष्ट्र संघटनेच्या वतीने शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सरंगल यांनी खेळाडूंना आपली कामगिरी राज्य व राष्ट्रीय पातळीवर न थांबविता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन संस्थेचे सरचिटणीस राधेशाम मुंदडा यांनी केले. आभार कोषाध्यक्ष नितीन चौधरी यांनी मानले. व्यासपीठावर क्रीडा संघटक आनंद खरे, प्रकाश सिकची, शेखर भंडारी आदी मान्यवर होते.

Story img Loader