गाववाडय़ाबाहेर राहणाऱ्या वडार समाजाची सामाजिक व इतर क्षेत्रातील प्रगती कासवगतीची आहे. विविध क्षेत्रात आरक्षणाचा लाभ घेऊन समाज थोडे-फार शिक्षण घेत आहे. तर काही मंडळी पारंपारिक उद्योग व्यवसायात नावलौकिक मिळवून एकूण समाजाच्या विकासात हातभार लावत आहेत. अशा कर्तृत्ववान मंडळींना वडार समाज विकास मंचच्यावतीने ‘गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कार दिले जातात. यंदाच्या वर्षांसाठी लोकसेवा प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक अंबादास धोत्रे यांना ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित केले जाणार आहे. तर भीमाशंकर आनंदकर, शंकर चौगुले पैलवान व राजू तिम्मा शिंदे यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ आणि फकिरा शिवराम विटकर, विठ्ठल आण्णा पाथरूट व गोपाळ शिंगे यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ तर राजाराम दगडू विटकर, आनंद साळुंखे व महेश घोडके यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराची घोषणा वडार समाज विकास मंचचे अध्यक्ष प्रा. डॉ. महादेव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली.
हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या ९ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता रविवार पेठेतील मंगोडेकर सांस्कृतिक भवनात आयोजिला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते व मुकुंद पोवार (इचलकरंजी) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिलेल्या या समारंभास नगरसेवक दत्ता बनपट्टे, नगरसेविका महादेवी  अलकुंटे, भरत विटकर (पुणे), उद्योजक शिवलिंग सुकळे हे उपस्थित राहणार आहेत. याचवेळी आंतरराष्ट्रीय कीर्तिचे चित्रकार शशिकांत धोत्रे व चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते नागराज मंजुळे यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे प्रा. डॉ. महादेव देशमुख यांनी सांगितले. या वेळी मंचचे सचिव काशीनाथ आनंदकर, कोशाध्यक्ष शंकर मंजेली, सिद्राम चौगुले, प्रा. अर्जुन धोत्रे हे उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Awards for 10 capable persnalities in vadar community