‘आता आपली वेळ नेतृत्त्व करण्याची’ ही यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना होती. याच संकल्पनेला अनुसरून पर्यावरण क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या नागपुरातील ग्रीन विजील या संस्थेच्या सदस्यांनी संपूर्ण शहरात पर्यावरण जनजागृती मोहीम राबवली. या मोहिमेत त्यांनी शहरातील तब्बल ३०० घरांना भेटी देऊन सुमारे १२०० नागरिकांना पर्यावरण संरक्षण व संवर्धनाविषयी जागृत करण्याचा प्रयत्न केला.
जगभरात जागतिक वसुंधरा दिन साजरा होत असताना यावर्षीसुद्धा सुमारे १९२ देशांतील एक अब्ज लोकांनी त्यात सहभाग घेतला. नागपूर शहरातसुद्धा वेगवेगळया संस्थांनी यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले. वसुंधरा दिनाच्या यावर्षीच्या संकल्पनेला अनुसरून नागरिकांना जागृत करण्यापासून त्यांनी सुरुवात केली. सकाळपासूनच या संस्थेच्या सदस्यांनी शहरातील वेगवेगळया भागात जाऊन नागरिकांची दारे ठोठावली. काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी तुरळक प्रतिसाद मिळाला. मात्र, पर्यावरण हा विषय अलीकडच्या काळात सर्वासाठीच परिचयाचा झाल्याने सकारात्मक प्रतिसाद अधिक मिळाला. या मोहिमे अंतर्गत त्यांनी लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वासोबत चर्चा केली. पर्यावरण मानवासाठी कसे आवश्यक आहे, पर्यावरणावर आधारित संतुलीत जीवनशैली कशी आहे, एक सामान्य नागरिकसुद्धा पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी काय करू शकतो आदी इत्यंभूत माहिती यावेळी देण्यात आली. सुमारे ३०० घरातील नागरिकांशी यावेळी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत ग्रीन विजीलच्या कार्यकर्त्यांनी रामदासपेठेतील सेंट्रल मॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांना जागतिक वसुंधरा दिनाचे महत्त्व, पर्यावरणाचे महत्त्व याविषयी त्यांच्याशी संवाद साधत माहिती
दिली. नैसर्गिक संपदा संरक्षण, जल संरक्षण, जैवविविधतेचे संरक्षण, अपारंपरिक उर्जा स्त्रोताचा उपयोग, पर्यावरण संतुलीत जीवनशैली, जागतिक तापमानवाढ, जलवायु परिवर्तन यावर चर्चा केली. सामान्य माणसाला समोर येऊन जलवायुपरिवर्तनासारख्या महत्त्वपूर्ण मुद्यांना सोडवण्यासाठी नेतृत्त्व करण्याचे आवाहन ग्रीन विजीलचे सहसंस्थापक कौस्तुव चटर्जी यांनी यावेळी केले.
पर्यावरण संरक्षणाच्या या अभियानास यशस्वी करण्यासाठी दक्षा बोरकर, संदेश साखरे, सुरभी जैस्वाल, विष्णुदेव यादव, मेहुल कोसुरकर, नाजमा खान, हेमंत अमेसार, राहूल राठोड, शीतल चौधरी, कल्याण वैद्य, निलेश मुनघाटे, आकाश शेंडे, शुभम येरखेडे, कमारेश टीकादर आदींनी सहकार्य केले. फ्युचर ग्रुप सेंट्रल मॉलचे पद्मकुमार कुट्टी व करण सिंह यांनीही या कार्यक्रमाला सहकार्य केले.
संग्रहित लेख, दिनांक 24th Apr 2015 रोजी प्रकाशित
पर्यावरण संरक्षण-संवर्धनासाठी ‘ग्रीन विजील’ची जनजागृती मोहीम
‘आता आपली वेळ नेतृत्त्व करण्याची’ ही यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना होती. याच संकल्पनेला अनुसरून पर्यावरण क्षेत्रात गेल्या अनेक
First published on: 24-04-2015 at 12:54 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Awareness campaign for protection and conservation of environment