मार्च-एप्रिल महिन्यात जंगल पेटायला सुरुवात होते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने चार-पाच दिवसांपूर्वीच आगीचे तांडव अनुभवले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पसुद्धा दरवर्षी कमी-जास्त प्रमाणात का होईना हे तांडव अनुभवतो. अगदी किरकोळ कारणांमुळे उभ्या जंगलास आगी लागतात आणि त्यात जैवविविधता बेचिराख होते. हनुमान जयंतीच्या पर्वावर भाविकांनी जंगलात मांडलेल्या भंडाऱ्यानेसुद्धा मेळघाटात आगीचे डोंब उसळतात. निसर्ग संरक्षण संस्थेने मात्र त्यांच्या प्रयत्नातून त्यावर तोडगा काढला आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात कांद्री बाबा अनुमान मंदिर आहे. दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त पाच ते सहा हजार भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. काही भाविक या ठिकाणी स्वयंपाक करून हनुमानजीला नैवेद्य अर्पण करतात आणि इतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करतात. दूरवरून आलेले भाविक त्यांची वाहने थेट मंदिरापर्यंत नेतात. त्यामुळे मंदिराजवळ स्वयंपाक करण्यास जागा उरत नाही. लोक जंगलाच्या आत जाऊन नैवेद्याचा स्वयंपाक करतात. स्वयंपाक झाल्यावर चुलीतील आग विझवणे अपेक्षित असताना चूल तशीच पेटती राहते आणि जंगलात वणवा लागण्यास कारणीभूत ठरते. दर्शनाला आलेले काही भाविक पूजा आटोपल्यानंतर उरलेला कचरा मंदिर परिसरातील जंगलात टाकतात. यामधील प्लास्टिक पिशव्या हवेसोबत जंगलात दूरवर पसरतात. यामुळे अनेक वन्यप्राण्यांच्या खाण्यात हे प्लास्टिक जाऊन त्यांच्या जीवितास धोका होतो.
या दोन्ही बाबींचे गांभीर्य लक्षात घेऊन मेळघाटात गेल्यार २५ वषार्ंपासून कार्यरत निसर्ग संरक्षण संस्थेने यावर तोडगा काढण्याचे ठरवले. अमरावती येथील निसर्ग संरक्षण संस्थेचे कार्यकारी अधिकारी कुणाल पोटोडे यांच्या मार्गदर्शनात संस्थेचे संवर्धन सहाय्यक अधिकारी राहुल काळमेघ यांनी तारबांद्रा येथील स्थानिक दहा आदिवासी युवक व वन कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीला धारणी येथील आदिवासी कल्याण विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पोळ, तारुबांदा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सौदागर, वनपाल लौदिलायते, वनरक्षक पवार उपस्थित होते. निसर्ग संरक्षण संस्थेतर्फे या अभियानांतर्गत तारुबांदा ते कांद्री बाबा हनुमान मंदिर परिसरापर्यंत जागोजागी प्लास्टिक प्रदूषणावर जनजागृती करणारे फलक लावण्यात आले. हनुमान जयंतीच्या दिवशी भक्तांची वाहने व्यवस्थित मंदिराच्या बाजूला एका रांगेत उभी करून ठेवली गेली. त्यामुळे मंदिराजवळ नैवेद्य करण्यास जागा उपलब्ध झाली. नैवेद्य तयार झाल्यावर चुलीतील आग तशीच राहिल्यास काय परिणाम होऊ शकतो हे भाविकांना सांगून चूल विझवण्यास सांगण्यात आले. प्लास्टिक कचऱ्याचा वन्यप्राण्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देऊन भाविकांना त्याठिकाणी कचरा टाकण्यापासून परावृत्त करण्यात आले. याचा परिणाम म्हणजे यंदा कांद्री बाबा मंदिर परिसरात वनवणव्याची अनुचित घटना घडली नाही. तसेच वन्यजीव क्षेत्रात प्लास्टिक पिशव्यासुद्धा पसरल्या नाहीत.
या मोहिमेकरिता निसर्ग संरक्षण संस्थेचे अशोक आठवले, गजानन शनवारे, नेहरू येवले, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनरक्षक जी.डी. पवार, पी.आर. वानखेडे आदींनी सहकार्य केले.