मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर रेल्वे फाटकांची संख्या अत्यंत नगण्य असली, तरीही उर्वरित रेल्वे फाटकांमधून प्रवाशांनी रेल्वेरूळ ओलांडताना काय काळजी घ्यावी, याबाबतच्या सूचना आता मध्य आणि पश्चिम रेल्वे मोठय़ा प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचवत आहे. आंतरराष्ट्रीय रेल्वे फाटक जागरूकता दिनानिमित्त सध्या जागरूकता सप्ताह सुरू असून या सप्ताहात विविध क्लृप्त्या लढवून प्रवाशांना जागरूक केले जात आहे.
२०१३च्या अखेपर्यंत देशभरात ३१ हजार २५४ रेल्वे फाटक होते. त्यापैकी ६० टक्के म्हणजे १८ हजार ६७२ रेल्वे फाटक हे एखाद्या व्यक्तीकडून हाताळले जात होते. उर्वरित १२ हजार ५८२ रेल्वे फाटकांवर कोणत्याही व्यक्ती कार्यरत नव्हत्या. मध्य रेल्वेबाबत विचार करायचा तर, गेल्या चार वर्षांत मध्य रेल्वेवरील १३८ रेल्वे फाटके बंद करून तेथे पूल उभारून प्रवाशांची सोय करण्यात आली. येत्या तीन वर्षांत मध्य रेल्वे १०९ फाटके बंद करण्यात येणार आहेत.
आंतरराष्ट्रीय रेल्वे फाटक जागरूकता दिनाच्या निमित्ताने मध्य रेल्वे विविध शाळा, ग्रामपंचायती, प्रादेशिक परिवहन कार्यालये, बस स्टँड येथे समुपदेशन कार्यशाळा घेणार आहे. त्याशिवाय ज्या रेल्वे फाटकांदरम्यान प्रवाशांची वाहतूक जास्त होते, तेथे एक नियंत्रक नेमणार आहे. रेल्वे फाटक ओलांडताना प्रवाशांनी काय काय काळजी घ्यायला हवी, कोणत्या गोष्टी टाळायला हव्या, याबाबत मार्गदर्शन करणारे फलकही मध्य रेल्वेतर्फे लावण्यात येणार आहे.
लहानग्यांवर लक्ष केंद्रीत
पश्चिम रेल्वेने कार्यशाळा आणि इतर गोष्टींबरोबरच लहान मुलांवर लक्ष केंद्रित करत त्यांच्या मनात याबाबत जागृती निर्माण करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी ल्युडो आणि सापशिडी अशा खेळांचा वापर केला आहे. रेल्वेच्या नियमांबाबत मजेशीर पद्धतीने माहिती देणारे हे खेळ पश्चिम रेल्वेने तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांमध्ये वाटले आहेत.
लहान मुले चांगल्या गोष्टी लवकर शिकतात आणि आपल्या पालकांनाही शिकवतात. त्यामुळे आम्ही लहान मुलांनाच रेल्वे फाटक, रेल्वे नियम यांच्याबाबत सजग करण्याचा प्रयत्न करत आहोत.
शरत् चंद्रायन,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे.