आयुषवरील खून व अपहरणाचा आरोप सिद्ध झालेला असला, तरी खुनामागील त्याचा हेतू काय होता, हे सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, असे मत अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.जे. अकर्ते यांनी त्यांच्या ८६ पानांच्या निकालपत्रात व्यक्त केले आहे. मरण पावलेला कुश हा आठ वर्षांचा निष्पाप बालक होता आणि त्याचे आरोपी आयुषशी काही वैर नव्हते. मात्र आयुषने त्याला सोबत नेले, तेव्हाच त्याने कुशला मारण्याचा निश्चय केला होता. या घटनेमुळे कुशच्या कुटुंबियांना जोरदार धक्का बसला. यामुळे आयुष हा गुन्हेगार ठरतो, असे न्यायाधीशांनी नमूद केले.
असे असले तरी, सरकार पक्षाचा आरोप आहे त्यानुसार खंडणीची मोठी रक्कम उकळण्याचा किंवा या बालकाचा खून करण्याचा आयुषचा उद्देश सिद्ध झालेला नाही. त्यामुळे हा गुन्हा ज्यात मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ प्रकारात मोडत नसल्याचेही न्यायाधीशांनी स्पष्ट केले.
आयुषच्या कपडय़ांवर आढळलेले रक्ताचे डाग लपवण्याचा प्रयत्न कुणी केला तेही सिद्ध झालेले नाही. फक्त, हे रक्ताळलेले कपडे कुठे लपवण्यात आले आहेत याची आरोपी नवीनला माहिती होती, एवढीच गोष्ट सिद्ध झालेली आहे. नवीन हा आयुषचा मोठा भाऊ आहे. त्यामुळे भावाच्या प्रेमापोटी त्याने बयाण देताना या कपडय़ांचा ठावठिकाणा पोलिसांना सांगितला नसावा हे अपेक्षित आहे. सामान्यत: आयुषच्या कृत्यामुळे त्याच्या कुटंबियांनाही भोगावे लागले हे अपेक्षित आहे. मात्र नवीनने ज्या दिवशी बयाण दिले, त्या दिवशी त्याचा काही गुन्हेगारी हेतू होता हे सिद्ध करणारा पुरावा मिळालेला नाही, असेही न्यायाधीश अकर्ते यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्रात गाजलेल्या या खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी आज सकाळी कुश कटारियाच्या वडिलांसह त्याचे इतर कुटुंबीय, वकील आणि पत्रकार मोठय़ा संख्येत न्यायालयात उपस्थित होते. न्यायाधीश जी.जे. अकर्ते यांनी आयुष व नवीन या दोन आरोपींना त्यांच्याविरुद्धचे आरोप सिद्ध झाल्याचे सांगून शिक्षेबद्दल त्यांचे मत विचारले. शिक्षेबाबत युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आयुषला मृत्यूदंडाची शिक्षा मिळावी असा आग्रह केला, तर बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपी निर्दोष असल्याचा दावा केला. यानंतर दुपारी पावणेचारच्या सुमारास न्यायालयाने निकाल जाहीर केला. त्यावेळीही न्यायालय खच्चून भरलेले होते. शिक्षा जाहीर झाल्यानंतर आयुषच्या डोळ्यात पाणी आले. त्याच्या भावांना मात्र सुटका झाल्याचे समाधान होते. कुशचे वडील निकालाने समाधानी दिसले नाहीत. ‘आमचा मुलगा तर गेला, तो आता परत येणार आहे का?’ अशी हताश प्रतिक्रिया कटारिया कुटुंबातील एका महिलेने नोंदवली.
या खटल्याची सुनावणी ३ ऑक्टोबर २०१२ रोजी सुरू होऊन अंतिम युक्तिवादानंतर २६ मार्च २०१३ रोजी संपली. त्यानंतर आज निकाल जाहीर करण्यात आला. सरकार पक्षातर्फे या खटल्यात ३५ जणांची साक्ष नोंदवण्यात आली.  
सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली होती व त्यांना अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी यांनी सहाय्य केले. आयुषतर्फे अंबरीश सोनक व हितेश काटेकर, तर नवीन व नितीनतर्फे आर.के. तिवारी या वकिलांनी युक्तिवाद केला. कटारिया कुटुंबियांच्यावतीने अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी सरकार पक्षाला मदत केली.

उच्च न्यायालयात अपील करणार
या खटल्यातील मुख्य आरोपी आयुष याला मिळालेली शिक्षा कमी असून, त्याच्या फाशीसाठी सरकार पक्ष उच्च न्यायालयात अपील करेल, असे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी निकालानंतर पत्रकारांना सांगितले. आयुषने कुशला पळवून नेले व त्याचा खून केला, हे न्यायालयाने मान्य केले आहे, परंतु हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ प्रकारचा गुन्हा ठरण्यासाठी त्याच्या खुनाचा उद्देश मात्र सरकार पक्षाला सिद्ध करता आला नसल्याचे न्यायालयाने सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या तपासात परिश्रम घेतले, तरीही पोलीस तपासात काही उणिवा राहिल्या असून त्यासाठी ‘रायटर’ लोकांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आयुषच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्यात येईल, असे त्याचा भाऊ नवीन यानेही सांगितले.