नव्या वर्षांच्या पहिल्या तीन आठवडय़ांत बॉलिवूडला ‘ब्लॉकबस्टर’  मिळालेला नाही. आता ‘रेस २’ हा बडे कलावंत, बडा बॅनर आणि बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंतु, बॉलिवूडला तोडीस तोड उत्तर देत ‘बालक पालक’ या रवी जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपटाने दुसऱ्याच शुक्रवारी गल्लापेटीवर दणका देऊन ‘मटरू की बिजली का मंडोला’ या बडय़ा चित्रपटावर मात करून यश मिळविले आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवडाअखेर ‘बालक पालक’ने तब्बल १.८० कोटी रुपये असा विक्रमी गल्ला गोळा केला तर तीन आठवडय़ांमध्ये जवळपास ६ कोटी रुपयांचा आकडा ओलांडला, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते उत्तुंग ठाकूर यांनी ‘वृत्तान्त’ला दिली. आता तर कधी नव्हे तो या चित्रपटाच्या तिकिटांचा काळा बाजार होत आहे.
नवीन वर्षांच्या सुरुवातीला आणि खास करून २६ जानेवारीला धरून सर्वसाधारणपणे बिग बजेट बॉलिवूडपट प्रदर्शित करून प्रेक्षकांकडून हमखास प्रतिसाद मिळेल अशी खूणगाठ बांधली जाते. यावर्षी २५-२६-२७  जानेवारी अशी सलग वीकेण्ड सुट्टी आल्याने ‘रेस २’ या सीक्वेलपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळेल, अशी चर्चा आहे. परंतु, नव्या वर्षांच्या पहिल्या तिन्ही शुक्रवारी बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. ‘मटरू की बिजली का मंडोला’, ‘टेबल नंबर २१’, ‘देहराडून डायरी’, ‘राजधानी एक्स्प्रेस’, ‘गंगूबाई’, ‘इन्कार’, ‘मेरी शादी कराओ’, ‘मुंबई मिरर’, ‘बंदूक’ असे चित्रपट पहिल्या तीन शुक्रवारी प्रदर्शित झाले. परंतु, यामध्ये ‘इन्कार’ आणि ‘मटरू की बिजली का मंडोला’ हे दोन चित्रपट वगळले तर अन्य चित्रपट बिग बजेट नव्हते. या चित्रपटांना गल्लापेटीवर फारसे यश मिळाले नाही. ‘मटरू..’ आणि ‘इन्कार’ हे दोन बिग बॅनर, गाजावाजा झालेले आणि बडे कलावंत असलेले चित्रपट असूनही त्यांनी साफ निराशा केली.
बॉलिवूडच्या या निराशाजनक पाश्र्वभूमीवर ४ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘बालक पालक’ने पहिल्याच आठवडय़ात १.८० कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. ‘मटरू की ..’ ने ४१ कोटींचा गल्ला गोळा केला आहे. परंतु, बजेट, प्रसिद्धीचा खर्च याबाबत मराठी आणि हिंदीची तुलनाच होत नाही. ‘मटरू’च्या बजेटच्या गल्ल्याच्या तुलनेत त्याचा गल्ला फारसा नाही. त्यामुळेच ‘बालक पालक’ने गल्लापेटीवर मिळालेले यश वाखाणण्याजोगे आहे.
‘बालक पालक’चे सीमोल्लंघन
रवी जाधव दिग्दर्शित ‘बालक पालक’ हा लैंगिक शिक्षण या विषयावरचा राज्यभरात गाजत असलेला चित्रपट शुक्रवारपासून हैदराबाद, दिल्ली व इंदूर येथे प्रदर्शित झाला. टप्प्याटप्प्याने सूरत, अहमदाबाद, बंगळुरू येथेही तो प्रदर्शित केला जाणार आहे. ंवितरक राहुल अस्थाना हेच राज्याबाहेरही चित्रपट वितरीत करीत असून या सीमोल्लंघनासाठी पीव्हीआर सिनेमा आणि आयनॉक्स, ब्रॉडवे व अन्य कंपन्यांचीही मदत घेण्यात आली आहे. दिल्ली, हैदराबाद, इंदूर येथील मराठी प्रेक्षकांबरोबरच अमराठी प्रेक्षकांनाही इंग्रजी उपशीर्षके असलेला ‘बालक पालक’  पाहण्याची संधी चित्रपटाच्या निर्मात्यांनी उपलब्ध करून दिली असून यानिमित्ताने मराठी चित्रपटाला वितरणाचा नवा मार्ग खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी रवी जाधव यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलेला ‘नटरंग’ हा चित्रपट इंग्रजी उपशीर्षकांसह चर्चगेट येथील इरॉस तसेच अन्य काही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता आणि त्याला अमराठी प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद लाभला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा