येथील गणेश वाचनालयाच्या वतीने ज्येष्ठ मराठी साहित्यिक बी. रघुनाथ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बी. रघुनाथ महोत्सवाचे आयोजन ३ ते ६ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे.
बी. रघुनाथ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मराठवाडय़ात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या १० वर्षांपासून गणेश वाचनालय व जनशक्ती वाचक चळवळीच्या वतीने चारदिवसीय महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा ११वे वर्ष असून जन्मशताब्दी वर्षांची सांगता याच महोत्सवात होणार आहे. शनिवार बाजार येथील गणेश वाचनालयात दररोज सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम होणार आहेत. दि. ३ सप्टेंबरला ‘जनी जाय पाणियाशी’ हा संत जनाबाईच्या रचनांवरील गाण्याचा कार्यक्रम होईल. प्रा. डॉ. अशोक जोंधळे, गायिका आशा जोंधळे, मंगेश पंजने, राहुल अपशेट्टे, सुभाष जोगदंड यात सहभागी होणार आहेत. दि. ४ सप्टेंबरला ‘मुखपृष्ठाची गोष्ट’ कार्यक्रम चित्रकार रविमुकुल (पुणे) सादर करणार आहेत. दि. ५ सप्टेंबरला कविसंमेलनात अजिम नवाज राही (सिंदखेडराजा), सलील वाघ (पुणे), व्यंकटेश चौधरी (नांदेड), नागराज मंजुळे (मुंबई), सुचेता खल्लाळ (नांदेड) सहभागी होतील. दि. ६ सप्टेंबरला ‘एक पुस्तक एक दिवस’ या मध्ये मध्ययुगीन धर्मसंकल्पनाचा विकास या पुस्तकावर अरुणचंद्र पाठक (मुंबई) यांचे भाषण होईल. पुस्तकाचे लेखक डॉ. सुधाकर देशमुख (उदगीर) आहेत. महोत्सवात मोठय़ा संख्येने रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जनशक्ती वाचक चळवळ व गणेश वाचनालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा