ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व मॅगसेस पुरस्काराने सन्मानित डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांच्या अथक परिश्रमातून उभ्या राहिलेल्या हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाला सामाजिक कार्याची आवड असणारे नवे शिलेदार हवे आहेत. या शिलेदारांची निवड स्वत: प्रकल्प व्यवस्थापन करणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्य़ातील घनदाट जंगलात अतिदुर्गम भागातील भामरागड या तालुक्यात बाबा आमटे यांच्या संकल्पनेतून प्रसिध्द समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या पुढाकाराने २३ डिसेंबर १९७३ रोजी लोकबिरादरी प्रकल्पाला सुरुवात झाली. वैद्यकशास्त्राची पदवी घेतल्यानंतर मुंबई, पुण्यात काम करण्यापेक्षा डॉ. प्रकाश आमटे यांनी गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातील भामरागड या घनदाट अरण्यप्रदेशात आदिवासींची सेवा करण्याला पसंती दिली. आज हेमलकसा आमटे दाम्पत्याची कर्मभूमी बनली आहे.
जेव्हा सर्वप्रथम डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी या अतिदुर्गम प्रदेशात आले तेव्हा येथे येण्यास कुठल्याही प्रकारचे साधन नव्हते. शेकडो मैल पाय तुडवत नदी, नाले ओलांडूर स्वत:चा जीव धोक्यात घालून येथे यावे लागायचे, मात्र अशाही परिस्थितीत आमटे दाम्पत्याने येथे आदिवासींची सेवा केली. या दोघांच्या अथक परिश्रमातूनच हा प्रकल्प उभा राहिला आणि नावारूपाला आला.
सध्या या प्रकल्पाला कार्यकर्त्यांची कमतरता भेडसावत आहे. त्यामुळेच सामाजिक कार्याची आवड असलेल्या कायमस्वरूपी राहणाऱ्या कार्यकर्त्यांची या प्रकल्पाला आवश्यकता आहे. पशुसंवर्धन प्रकल्पाकरिता पशुधन अधिकारी डिप्लोमा किंवा डिग्री असणारा येथे हवा आहे. लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने हेमलकसा येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आली आहे.
या शाळेतून आदिवासी तरुण-तरुणींना सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आदिवासी मुलांना खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी क्रीडा प्रशिक्षकाची, तसेच आदिवासी बांधवांना व मुलींना संगीताचे शिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक व शाळेतील ग्रंथालय अद्यावत ठेवण्यासाठी ग्रंथपालाची गरज आहे. या प्रकल्पाच्या वतीने गरीब आदिवासींना मोफत आरोग्यसेवाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या दवाखान्याकरिता सेवा देणारे डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय यांचीही गरज आहे.
लोकबिरादरीच्या नागेपल्ली प्रकल्पाकरिता आधुनिक शेतीची माहिती असणारा शेतीनिष्ठ कार्यकर्ता हवा आहे. या सर्वाना प्रकल्पाच्या वतीने योग्य ते मानधन, तसेच राहण्याची व्यवस्थाही येथे आहे. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या व्यक्तींनी लवकरात लवकर अनिकेत आमटे यांच्याशी ७५८८७७२८६० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने करण्यात आले आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा