कुष्ठरुग्णांबाबत बाबा अतिशय संवेदनशील होते. हा आजार औषधोपचारांनी बरा होऊ शकतो. मात्र त्यांच्या मानसिक वेदना कमी करायच्या असतील तर त्यांना कामात गुंतवून ठेवणे गरजेचे आहे, असे बाबा आमटे यांचे ठाम मत होते, असे प्रतिपादन भारती आमटे यांनी नुकतेच ठाण्यात केले.
घंटाळी मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून ‘तेथे कर माझे जुळती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारती आमटे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सेवा म्हणजे काय हे बाबांकडून शिकलो. रक्त, घाम आणि अश्रू आटवून बाबांनी दिवस-रात्र काम केले.
कुष्ठरोग्यांबरोबरच अपंग, गरोदर, निराधार महिलांनाही बाबांनी आनंदवनात आश्रय देऊन त्यांची आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अखंड सेवा केली. आनंदवनातील विविध कामांमुळे रुग्णांना समाधान आणि आनंदही मिळतो. रुग्णांसाठी बाबा हे नातेवाईकांपेक्षाही जवळचे होते. अनेकजण बाबा आमटे यांना देवदूत म्हणत. मात्र त्यांना देवदूत या शब्दांची चीड होती.
मी माणूस आहे आणि मला माणूसच समजा असे ते सांगायचे. कोणतीही योजना ही भान ठेवून आखली पाहिजे आणि बेभान होऊन अमलात आणली पाहिजे हा त्यांचा मूलमंत्र होता. बाबांच्या या कार्यात साधनाताईची लाभलेली साथ, प्रकाश आणि विकास यांनी स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या याबद्दल भारती आमटे यांनी विस्तृत विवेचन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगाचार्य अण्णा व्यवहारे होते.

Story img Loader