दरवर्षी देण्यात येणारा ‘बाबा आमटे मानवता पुरस्कार’ २०१३ या वर्षांकरिता महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांना देण्यात येत आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा वरोऱ्याच्या विद्यार्थी सहाय्यक समिती या संस्थेने संस्थेच्याच ज्ञानदा जीवन विकास केंद्राने आयोजित केला आहे. पुरस्कार प्रदान सोहळा रविवार १३ जानेवारीला दुपारी ३.३० वाजता आयोजित केला आहे. माजी सनदी अधिकारी पुण्याच्या चाणक्य मंडळाचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, तर अध्यक्षस्थानी नागपूरच्या शासकीय कृषी महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य वसंतराव गोरंटीवार असतील.
डॉ. अभय बंग यांचे प्रबोधनात्मक विचारमंथन आणि अविनाश धर्माधिकारी यांच्या अनुभवातून प्राप्त झालेले ओजस्वी विचार ऐकणे व स्पर्धा परीक्षाकरिता युवकांना प्रेरित करणे, हे या सोहळ्याचे वैशिष्टय़ ठरणार आहे. गेल्या वर्षी हा पुरस्कार हिवरेबाजारचे पोपटराव पवार, लेखा मेंढय़ाचे १६०० हेक्टर जंगल गावाच्या मालकीचे करणारे शिल्पकार मोहन हिराबाई हिरालाल यांना देण्यात आला होता.
हा पुरस्कार गोवा स्वातंत्र्य संग्राम सैनिक, बाबा आमटे यांच्याशी दीर्घकाळ जिव्हाळ्याचे संबंध आणि आनंदवनच्या महारोगी सेवा समितीचे पूर्वीपासूनचे विश्वस्त भद्रावतीचे श्रीधरराव पद्मावार यांनी प्रायोजित केला आहे. स्वातंत्र संग्राम सैनिक म्हणून मिळणारे मानधन आयुष्यभर समाजसेवी उपक्रमांकरिताच उपयोगात आणणारे हे व्रतस्थ साधक आहेत. याच निधीतून दरवर्षी हा पुरस्कार २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र या स्वरूपात देण्यात येतो. या कार्यक्रमाला बाबा आमटेंविषयी आपुलकी असणाऱ्या व्यक्तींनी आवश्यक उपस्थित रहावे, अशी विनंती विद्यार्थी सहायक समिती वरोरा या संस्थेचे संस्थापक सचिव व अध्यक्ष प्रा. मधुकर उपलेंचवार यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा