आमच्या देशातील परंपरेनुसार ज्यांनी देश व समाजाची उल्लेखनीय कौतुकास्पद सेवा केली आहे त्यांच्या नावाला अजरामर करण्याकरिता त्यांच्या नावाच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन सरकारतर्फे केले जाते. याच मालिकेत आज बाबा जुमदेवांवरील टपाल तिकिटाचे प्रकाशन केले जात आहे. बाबा जुमदेवांनी मानव समाजाला अंधश्रद्धेसह वाईट व्यसनं व सवयींपासून दूर करून चांगल्या गोष्टी अंगीकारण्याची सवय लावली. यात त्यांनी कोणत्याही जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन कार्य करण्याची प्रेरणा या मानव समाजाला दिली. लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वाना त्यांच्यावरील टपाल तिकीट व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनाची प्रेरणा देणारं असून, सरळ मार्गावर चालण्याची सवय लावेल. त्यांचे हे कार्य महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपऱ्यात ओळखले जावे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती मो.हमीद अंसारी यांनी केले.
परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक बाबा जुमदेवजी यांच्यावरील टपाल तिकिटाच्या प्रकाशन सोहळ्यात ते येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल शंकर नारायणन्, केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार डी.पी.त्रिपाठी, खासदार के.सी.त्यागी, वर्षां पटेल, परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर, आमदार गोपालदास अग्रवाल, आमदार अनिल बावणकर, दूरसंचार व टपाल विभागाचे कर्नल के.सी.मिश्रा, कुडवाच्या सरपंच करुणा गणवीर आदी उपस्थित होते.
उपराष्ट्रपती म्हणाले की, बाबा जुमदेव हे गरीब कुटुंबात जन्मलेले असूनही त्यांनी मानवजातीतील वाईट प्रथांना दूर करण्याचे मंत्र समाजाद्वारे दिले. त्यांच्यावरील टपाल तिकीट प्रकाशनाने त्यांचे हे कार्य आता समग्र भारतापासून अलिप्त राहणार नसून लोकही त्यांचे नाव ऐकल्यानंतर त्यांच्याविषयी जाणून घेण्यास आतुर असतील. त्यांची आठवण जिवंत ठेवण्याची गरज आज समाजाला आहे.
राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाल्यावर सर्वप्रथम बाबा जुमदेवांच्या तलचित्राला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी राज्यपाल शंकर नारायणन् म्हणाले, बाबा जुमदेव यांनी सामाजिक रुढीवादी परंपरेविरुद्ध लोकांमध्ये जागृती निर्माण केली. त्यांना झालेल्या भगवंताच्या साक्षात्कारानंतर त्यांनी समाजाला व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न केला. अंधविश्वास व जादूटोणा हे आजच्या पुढारलेल्या समाजातील एक भाग आहेच. याविरुद्ध लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. भारत एक रुढीवादी देश आहे. येथील तरुणाई खूप क्षमतावान आहे. ही वेळेप्रसंगी देशाला पुढे नेण्यात सहाय्यभूत होणार आहे.
केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी याप्रसंगी बाबा जुमदेव यांच्या समाजकारणाची स्तुती करून त्यांनी एका स्वच्छ समाजनिर्मितीची संकल्पना साकारली. त्यांच्या ३ एप्रिल या जयंती दिनी महाराष्ट्र शासनाने शासकीय सुटी जाहीर करावी, अशी विनंती राज्यपालांना करून याकरिता स्वत व आमच्या पक्षासह इतर पक्षांच्याही आमदारांकडून केली जाणार असल्याचे म्हटले. प्रास्ताविक राजू मदनकर यांनी केले. खासदार के.सी.त्यागी व अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांचीही यावेळी भाषणे झाली. या कार्यक्रमाकरिता गोंदिया, भंडारासह चंद्रपूर, बालाघाट, नागपूर व छत्तीसगडमधील परमात्मा एक सेवक मंडळाच्या एक लाखांवर लोकांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे संचालन आमदार राजेंद्र जैन व आभार माजी आमदार दिलीप बंसोड यांनी मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा