कुपोषणमुक्तीसाठी येथे राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानांतर्गत आयोजित तालुकास्तरीय कार्यशाळेत शून्य ते सहा वयोगटातील बालकांची तपासणी करण्यासह मातांनाही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन आ. राजीव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती विजय जाधव होते. या वेळी उपसभापती लता दौंड, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, सरपंच संघटनेचे किसन जोर्वेकर, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ महाजन, गटविकास अधिकारी मालती जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी गणेश चौधरी आदी उपस्थित होते.
कुपोषणमुक्ती अभियान ७ एप्रिल २०१३ पर्यंत जरी राबविण्यात येत असले, तरी कालावधी महत्त्वाचा न मानता आपण सर्वानी सतत कुपोषणमुक्तीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असे आवाहन या वेळी आ. देशमुख यांनी केले. आपली भावी पिढी आरोग्यसंपन्न असली पाहिजे ही आपली सर्वाची जबाबदारी समजून तालुका कुपोषण मुक्तीसाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. हे अभियान तळागाळापर्यंत पोहचवून गरजूंना कुपोषणमुक्त करावे, वाडेवस्ती, तांडे, आदिवासी वस्ती इत्यादी भागात त्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. आरोग्य व बाल विकास या दोन्ही विभागांनी समन्वयाने हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन सभापती विजय जाधव यांनी केले. गटविकास अधिकारी मालती जाधव यांनी अभियानासंबंधी माहिती देऊन मार्गदर्शन व सूचना केल्या. या अभियानात बालकांचे वजन व दंडघेर घेणे, नोंदी ठेवणे, किशोरवयीन मुली व मातांची आरोग्य तपासणी, कुपोषित बालकांना ग्राम विकास केंद्रात दाखल करणे, तीन वर्षांपेक्षा कमी वयातील बालकांची अधिक काळजी घेणे, नवविवाहित जोडप्यांचे समुपदेशन करणे, कुपोषण कमी करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, लोकसहभाग मिळविणे इत्यादी उपक्रमांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी दिली. कार्यशाळेचे प्रास्ताविक गणेश चौधरी यांनी केले.
कुपोषणमुक्ती कार्यशाळेत बालक व मातांची तपासणी
कुपोषणमुक्तीसाठी येथे राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानांतर्गत आयोजित तालुकास्तरीय कार्यशाळेत शून्य ते सहा वयोगटातील बालकांची तपासणी करण्यासह मातांनाही मार्गदर्शन करण्यात आले.
First published on: 12-01-2013 at 12:30 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baby and mother checking for malnutrition free work school