आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, गोल्फ कोर्स, सेट्रल पार्क, अर्बन हाट, एक्झिबिशन सेंटर असे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभारणाऱ्या सिडकोच्या दिव्याखाली किती अंधार असल्याची बाब उघड झाली असून तळमजल्यावर असलेल्या उपाहारगृहातील फ्राइड राइसमध्ये चक्कअळ्या आढळून आल्या तर उपाहारगृहाच्या स्वयंपाकघराची तपासणी केल्यानंतर रवा व मैदय़ाच्या पिठात रव्यापेक्षा उंदराची विष्ठाच जास्त असल्याचे दिसून आले. उपाहारगृहातील हा गलथान कारभार आणि अस्वच्छेतेमुळे उपाहारगृह दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली असून प्रशासन या उपाहार ठेकेदाराच्या विरोधात काही कारवाई करीत नसल्याने या संतापात अधिक भर पडली आहे.राज्यातील एक श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोकडे पाहिले जाते. वेळप्रसंगी राज्याला आर्थिक मदत देण्याची कुवत या महामंडळात आहे. साडेसात हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी विविध वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या महामडंळावर वर्णी लागावी यासाठी अनेक राजकीय-बिगरराजकीय पक्षांच्या कायकर्त्यांचा डोळा असल्याचे दिसून आले आहे. अशा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महामंडळातील उपाहारगृहाची दुर्दशा पाहण्यासारखी आहे. नव्याने नियुक्त झाल्यानंतर व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया या उपाहारगृहात अचानक फेरफटका मारून कर्मचारी काय करतात याची टेहळणी करीत होते पण भाटिया यांनी या उपाहागृहातील स्वयंपाकगृहाची कधी पाहणी केली नसल्याचे आज स्पष्ट झाले. दोन दिवसांपूर्वी योगेश पाटील नावाच्या कर्मचाऱ्याने या उपाहागृहातून फ्राइड राइस मागविला होता. त्या वेळी या प्राइड राइसमध्ये चक्क एक जिवंत अळी (कोणी त्याला गांढूळदेखील म्हणत आहे) आढळून आली. विशेष म्हणजे ही अळी त्या पाटील यांनी तोपर्यंत आर्धी खाल्ली होती. ताटात अळी असल्याचे समोर बसलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले. या अळी नाटय़ानंतर कर्मचाऱ्यांनी उपाहारगृह ठेकेदाराला धारेवर धरले. त्या वेळी त्याच्या स्वयंपाकघराची तपासणी केली असता बाबा आदमच्या जमान्यातील डब्बे अन्नपदार्थ ठेवण्यास वापरण्यात येत असल्याचे दिसून आले. या डब्यातील रवा व मैदा याची पाहणी केल्यानंतर त्यात उंदराच्या विष्ठेचे अक्षरश: ढीग आढळून आले. या उपाहागृहाविषयी अभ्यागत आणि कर्मचाऱ्यांच्या यापूर्वीच अनेक तक्रारी आहेत पण प्रशासन आणि कामगार संघटना याबाबत काहीच करताना दिसून येत नाही. हा ठेकेदार अभ्यागतांना चढय़ा भावाने खाद्यपदार्थ विकत असल्याचे दिसून येते. अनेक वर्षांची या ठेकेदाराची मक्तेदारी झाल्याने त्याला हलविण्याची ताकद व्यवस्थापकीय संचालकांमध्येदेखील नाही अशी चर्चा आहे.

Story img Loader