आपल्या भागात लोकप्रतिनिधींचे वास्तव्य असल्यास त्वरीत विकास कामे होऊ शकतात, अशी सर्वसामान्यांची भावना असली तरी सर्वाच्याच बाबतीत ती खरी ठरेल असे नव्हे. दोन आमदार आणि एक नगरसेवक यांचे निवासस्थान असलेल्या गोविंदनगरमधील नागरिक रस्त्यांच्या संदर्भात तरी हाच अनुभव घेत आहेत.
राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्राजवळील पुलावरून गोविंदनगरकडे एक मुख्य रस्ता जातो. या रस्त्यापासूनच निघालेल्या एका जोड रस्त्याचा उपयोग सिडकोच्या शिवाजी चौक, राणा प्रताप चौक या भागातील वाहनधारक जवळचा रस्ता म्हणून करतात. या रस्तामार्गे नितिन भोसले व निर्मला गावित या दोन आमदारांची निवासस्थाने तसेच अश्विनी बोरस्ते या नगरसेविकेचे निवासस्थान आहे. दोन आमदारांसह नगरसेविकेचे वास्तव्य असल्याने हा रस्ता चकाचक राहाणे साहजिक होते. परंतु या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. ठिकठिकाणी डांबर उखडले गेल्याने खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहन चालकांच्या कौशल्याची खरोखरच परीक्षा पाहणारा ठरत आहे. या मार्गाने याआधी वाहतुकीचे प्रमाण कमी होते. परंतु इंदिरानगरकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाखाली करण्यात आलेल्या बोगद्यामुळे सव्र्हिसरोडवर जी वाहतूक कोंडी होते, त्या कोंडीत न अडकण्यासाठी पर्याय म्हणून या दुसऱ्या मार्गाचा अवलंब आता सिडकोकडे जाणारे व येणारे वाहनधारक अधिक प्रमाणावर करू लागले आहेत. वाहतूक वाढल्याने रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत आहे.
या रस्त्याचे असलेले महत्व लक्षात घेऊन त्याची त्वरीत दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
तिघा लोकप्रतिनिधींचे वास्तव्य असूनही रस्ता मरणासन्न
आपल्या भागात लोकप्रतिनिधींचे वास्तव्य असल्यास त्वरीत विकास कामे होऊ शकतात, अशी सर्वसामान्यांची भावना असली तरी सर्वाच्याच बाबतीत ती खरी ठरेल असे नव्हे. दोन आमदार आणि एक नगरसेवक यांचे निवासस्थान असलेल्या गोविंदनगरमधील नागरिक रस्त्यांच्या संदर्भात तरी हाच अनुभव घेत आहेत.
First published on: 04-06-2013 at 08:33 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad condition of road near to mla house in nashik