पनवेल-सायन हा नवीन बांधलेला महामार्ग खड्डय़ांमुळे धोकादायक ठरला आहे. खारघर ते कळंबोली या अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या या खड्डय़ांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. टोलवसुलीच्या लगीनघाईत आठपदरी मार्ग बांधणाऱ्या कंत्राटदार कंपनीने नवीन मार्गावर लक्ष केंद्रित केल्याने खारघर, कोपरा, कामोठे, कळंबोली या नोडमध्ये शिरण्यासाठी असलेल्या जुन्या रस्त्याचीही हीच स्थिती आहे. हे रस्ते सुधारणार कोण असा प्रश्न त्या निमित्ताने पुढे येत आहे. खारघर येथील उड्डाण पुलाखाली रोजची वाहतूक कोंडी येथील खड्डय़ांमुळे वाहनचालकांना सहन करावी लागते. या ठिकाणी रात्रीच्या वेळी वाहतूक पोलिसांनी खड्डा दाखविण्यासाठी एका पोलीस शिपायाची नेमणूक केली आहे. अशीच परिस्थिती रोडपाली येथील उड्डाण पुलाखाली आहे. रोडपाली नोडमध्ये जाणाऱ्या मार्गावर पुरुषार्थ पंपाजवळ खड्ड पडले आहेत. हा रस्ता सिडकोच्या देखरेखीखाली येतो. गेल्या वर्षीही येथे खड्डे होते. प्रसिद्धीमाध्यमांच्या बातम्यांनंतर येथे खड्डा बुजविणे व नवीन रस्ताचे कंत्राटे सिडको देते. सहा महिन्यानंतर पुन्हा येथे खड्डे पडतात. येथे सिडकोने बसविलेले पेव्हर ब्लॉक पुन्हा एकदा निघाले आहेत. सायन-पनवेल मार्गावरील कामोठे थांब्यावर कळंबोलीकडे जाताना असाच खड्डेमय रस्त्याचा प्रवास करावा लागतो. कळंबोली सर्कल येथे काँक्रीटचा रस्ता जोडणारा डांबरी रस्त्यामधील खड्डे अपघातांना आमंत्रण देणारे ठरत आहेत. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये संघवी स्टील कंपनी ते फ्लॉटग्लास कंपनी या तीन किलोमीटर हा मार्ग खड्डय़ांमध्ये हरवला आहे. येथे नवीन काँक्रीटच्या रस्त्याचे काम सुरू आहे. सिडको वसाहतीपैकी सर्वात वाईट रस्त्यांची अवस्था रोडपाली नोडमधील सेक्टर २० व १७ येथील आहे. नागरिकांनी सिडकोची कानउघाडणी करूनही येथील रस्त्यामधील खड्डे दुरुस्त होऊ शकले नाही. पावसाळ्यानंतरच हे रस्ते दुरुस्त करण्याचा सिडकोचा मानस असल्याने अजून दोन महिने येथील नागरिकांना खड्डय़ांतूनच प्रवास करावा लागणार आहे. पनवेल शहरामध्ये सखल ठिकाणी पाणी साचून नवीन बांधलेले रस्त्यांवरील डांबर निघण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच पनवेलच्या नवीन बांधलेल्या रस्त्यांचा दर्जा त्या निमित्ताने नागरिकांसमोर येत आहे.
कंत्राटदाराकडून रस्ते बांधून घेणाऱ्या संबंधित प्रशासनाने या रस्त्यांची देखरेख काही वर्षांसाठी संबंधित कंत्राटदाराकडे दिलेली असते. त्यामुळे हे रस्ते पुन्हा दुरुस्त करून देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. मात्र हे कंत्राटदारही अनेक महिन्यांच्या चालढकलीनंतर खड्डय़ांची दुरुस्तीची कामे हाती घेतात. तोपर्यंत प्रवाशांची हाडे खिळखिळी आणि वाहनांच्या दुरुस्तीचे काम निघालेले असते. सायन-पनवेल या मार्गावर टोलवसुलीची लगीनघाई कंत्राटदार कंपनीला लागली आहे. मात्र नेरुळ आणि जुईनगरच्या उड्डाण पुलावर आणि खालीसुद्धा खड्डे पडल्याने येथून जाणारे वाहनचालक पहिला मार्गाचा दर्जा सुधारा, वसुली कसली करताय अशी मते व्यक्त करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा