तिघांचे डोळे जाणार, अनेकांना संसर्ग
होळी आणि धूलिवंदन हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असला तरी रंगाने संसर्ग झालेल्या तसेच हाणामारी आणि अपघातात जखमी झालेल्या एकूण ७० पेक्षा अधिक रुग्णांवर मेडिकल आणि मेयोमध्ये उपचार करण्यात आले. शहरातील विविध भागात झालेल्या अपघातामध्ये आई-मुलासह १२ जणांचा मृत्यू झाला. शहर व जिल्ह्य़ात होळी व धुलिवंदन पारंपारिक पद्धतीने साजरा होत असताना बुधवारचा दिवस अनेकांच्या अतिउत्साहामुळे दुखदायी ठरला.
शहरातील विविध भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त असताना आणि वाहतूक पोलीस रस्त्यावर होते मात्र, अनेक भागांमध्ये वाहतूक पोलीस कारवाईत व्यस्त असल्याने वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले आणि होळी रक्तरंजित झाली. शहरातील अजनी, हुडकेश्वर, सक्करदरा, नंदनवन या भागात सर्वात जास्त अपघात झाले. या भागांमध्ये झालेल्या प्राणांतिक अपघातामध्ये सात वर्षीय मुलगी, मायलेक आणि दोन मित्रांचा बळी गेला. शहरात अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू आणि १० पेक्षा अधिक गंभीर जखमी झाले आहे. बुधवारी सकाळपासून मेडिकल रुग्णालयात वेगवेगळ्या रंगाचे इन्फेक्शन झालेले ११ रुग्णांवर तर नेत्र विभागात १९ रुग्णावर उपचार करण्यात आले असून त्यात दोन रुग्णांच्या डोळ्यांना गंभीर जखम झाली आहे.  
जावयाकडे होळी खेळण्यासाठी जात असताना सक्करदरा भागात एका इंडिका कारने छोटा ताजबागकडून येणाऱ्या एका मोटारसायकलला धडक दिल्याने त्यात त्रिमूर्तीनगरात राहणारे नीलेश महाजन आणि आई निर्मला महाजन हे दोघे मायलेक जागीच ठार झाल्या. बुधवारी दुपारी ही घटना घडली.  घटनेनंतर मोटारसायकवरील माय-लेकाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर कारचालक फरार झाला.
रमना मारोती भागात राहणारे राजेश महादेव कुकडे त्यांचा ७ वर्षांचा मुलगा अनिकेतला मोटारसायकलने घरी घेऊन जात असताना नेहरूनगर परिसरात एका चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. वर्दळीच्या भागात झालेल्या या अपघातामुळे चारचाकी वाहन चालकाला लोकांनी पकडून बेदम मारहाण केली. दरम्यान बापलेकांना खाजगी रुग्णालयात दाखल केले असताना अनिकेतला डॉक्टरांनी मृत घोषित केले असून राजेश कुकडे यांची प्रकृती गंभीर आहे. सकाळच्यावेळी घरासमोर रंग खेळत अनिकेत वडिलासोबत निघाला आणि काळाने त्यांच्यावर झडप घातली. अनिकेतच्या निधनाने रमना मारोती परिसरात शोककळा पसरली. अनिकेतचे वडील एका खाजगी कंपनीत नोकरीला आहेत. सक्करदरा पोलिसांनी चारचारी वाहन तालकाला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील गारगोटीनगर भागात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार आरुष उपाख्य प्रीतम पोटमासे हा जागीच ठार झाला तर त्याचा मित्र प्रदीप रमेश रामटेके जखमी झाला. प्रीतम आणि प्रदीप दोघे होळी खेळण्यासाठी वर्धारोडवरील मित्राकडे जात असताना हा अपघात झाला आहे. प्रदीप हा गंभीर जखमी असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेसानाका एका चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्यात दीपक रामअवतारसिंग ठाकूर (३७) ठार झाले तर सुरेंद्र चतुर्वेदी गंभीर जखमी झाले. रामअवतार सिंग हे बेसाकडून मामाकडे मोटारसायकलने जात असताना उलट दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली त्यात ठाकूर जागीच झाले तर चतुर्वेदी जखमी झाले असून त्याना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजनीतील मानेवाडा बेसा मार्गावर दोन मोटारसायकलीच्या धडकेमध्ये पूरचंद परिहार (अंबानगर) ठार झाले तर कपीलनगर परिसरात राहणारे बादल हरिसिंग ठाकूर (२५) जखमी झाले. नंदनवन परिसरातील कुभार टोली भागात झालेल्या अपघातामध्ये विकास दीपक गजभिये व रुपेय भारद्वाज या दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. दीपक आणि रुपेय हे दोघे अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते. मित्राकडं रंगाची होळी खेण्यासाठी जात असलेल्या या दोन मित्रांवर काळाने झडप घातल्याने नंदनवन परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. गिट्टीखदानमधईल गोरेवाडा रिंगरोड चौकात ट्रकने मोटारसाकलला धडक दिल्याने त्यात मोटारसायकलस्वार प्रवीण सोयाम याचा जागीच मृत्यू झाला.