शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून खड्डय़ांमुळे लोकांना विविध शारीरिक व्याधींचा त्रास सुरू झाला आहे, तसेच दुचाकी व चारचाकी वाहन मोठय़ा प्रमाणात नादुरुस्त होत असल्याने आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे. शहरवासियांचा हा त्रास दूर करण्यासाठी प्रथमोपचार पेटी, औषध, मृत्यू झाल्यास अंत्यविधीचा खर्च व वाहन दुरुस्तीचा खर्च मनपाने द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते व नगरसेवक संजय वैद्य यांनी आयुक्त प्रकाश बोखड यांना पत्र लिहून केली आहे. या मागण्यांची चर्चा मनपाच्या वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
शहरातील मुख्य मार्गावरील रस्त्यांची कामे अवघ्या दोन महिन्यापूर्वी केल्यानंतरही रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ते, अशी अवस्था असल्याने अपघातात वाढ झाली आहे, तसेच यामुळे अनेक नागरिकांना खांदेदुखी, कंबरदुखी व इतर स्नायूंचे आजार उद्भवले आहेत. मनपाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. किमान रस्त्यांची डागडुजी करून खड्डे तरी बुजवा, अशी विनंती केल्यानंतरही मनपाकडे खड्डे बुजविणारी यंत्रणा नसल्याने जैसे थे परिस्थिती आहे. त्यामुळे संतापलेले संजय वैद्य यांनी मनपाकडे या मागण्या केल्या आहेत. केवळ मागणीच केली नाही, तर मनपा आयुक्त प्रकाश बोखड यांना तसे पत्रही दिले आहे.
रस्त्यांची डागडुजी करण्यास मनपाची तज्ज्ञ यंत्रणा कमी पडत आहे किंवा अपयशी तरी ठरत आहे. कारण, लाखो रुपये खर्च करूनही शहरातील खड्डे कायमचे बुजविले जात नाहीत व याचा परिणाम नागरिकांच्या जीवावर होत आहे. यासाठी अतिवृष्टीचे कारण समोर केले जात असले तरी मनपाचाही यात दोष असल्याचा आरोप वैद्य यांनी केला आहे. शहरातील खड्डय़ांमुळे रस्त्यांनी जाणाऱ्या नागरिकांचे जीवघेणे अपघात होत असून त्यांच्या महागडय़ा वाहनांचेही नुकसान होत आहे. परिणामी, नागरिक महानगरपालिकेवर रोष व्यक्त करत आहेत. महानगरपालिका प्रशासन रस्त्यांची दुरुस्ती करण्यात असमर्थ ठरत असेल तर त्याऐवजी नागरिकांना खड्डय़ांमुळे त्यांचे झालेले नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. या अशा रस्त्यांवर किरकोळ अपघातामुळे जखमी झालेल्या नागरिकांना प्रथमोपचार साधनांची पेटी विनामूल्य देण्यात यावी, खराब रस्त्यांमुळे मोठा अपघात झाल्याने हात व पाय मोडलेल्यांना अस्थिरोगतज्ज्ञांचा उपचार मनपातर्फे उपलब्ध करून द्यावा, दुर्दैवाने या रस्त्यांमुळे झालेल्या अपघातात बळी गेलेल्या नागरिकांच्या अंत्यविधीचा खर्च मनपाने करावा, खराब रस्ते व खड्डय़ांमुळे ज्याांच्या वाहनांचे नुकसान होत आहे त्यांनाही आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही मागणी आहे. या मदत सवलतीव्यतिरिक्त जर मनपा प्रशासनाला शक्य झाल्यास खड्डेयुक्त रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांचा आरोग्य विमा व वाहनांच्या नुकसानभरपाईचा एकत्रित विमा काढल्यास नागरिकांना आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्यांचा मनपाच्या कार्यक्षमतेवर विश्वास निर्माण होईल, असा सल्लाही वैद्य यांनी दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा