गेल्या दीड महिन्यांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने नागरिक, वाहनचालकांना त्रास होत आहे. पत्रीपुलाजवळ खड्डय़ात दुचाकी आपटून अलिकडेच एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. मांडा-टिटवाळा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गांधारे पूल ते पडघा रस्त्यांची तसेच एमएसआरडीसीच्या दुर्गाडी ते मानपाडा रस्त्यांचीही चाळण झाली आहे. कल्याण-डोंबिवलीतील एकूण ४२ रस्ते सिमेंटचे होणार आहेत. ही कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. खडकपाडा येथील सिमेंटच्या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. आयुक्त बंगल्याकडे जाणारा सहजानंद चौक ते संतोषीमाता रस्ता खड्डय़ांमुळे खराब झाला आहे. डोंबिवलीत घरडा सर्कल ते टिळक पुतळा रस्ता सिमेंटचा करण्यासाठी खोदाई करण्यात आली. प्रत्यक्षात गेल्या नऊ महिन्यात सिमेंटच्या कामाचे शेलार चौक, घरडा सर्कलजवळ दोन तुकडे तयार करण्यात आले आहेत. या खोदाईमुळे घरडा सर्कल ते टिळक पुतळा चौकाची पूर्णत: दुर्दशा झाली आहे. डोंबिवली पूर्वेत गावदेवी मंदिर ते मानपाडादरम्यान रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. आयरेगाव, दत्तनगर चौक, डोंबिवली पश्चिमेत महात्मा गांधी रस्त्यावर(भावे सभागृह) सिमेंट रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. रस्त्याची एक बाजू खचली आहे. देवीचा पाडा, उमेशनगर, ह प्रभाग कार्यालयासमोरील बीएसएनएल कार्यालयाजवळ, गरीबाचा पाडा, गणेशनगर, महाराष्ट्रनगरमधील मांगल्य कॉम्प्लेक्सजवळ रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.
खड्डय़ांसाठी आठ कोटी
स्थायी समितीचे सभापती प्रकाश पेणकर यांनी सांगितले, मार्चपूर्वीचे आणि पावसाळ्यानंतर पालिका हद्दीत पडणाऱ्या खड्डय़ांसाठी ७ कोटी ६६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पावसाळ्यापूर्वी खड्डे भरण्याची कामे पूर्ण झाली आहेत. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात डांबर प्रकल्प बंद असतात. त्यामुळे खडी टाकून खड्डे बुजविण्याची कामे सुरू आहेत. सप्टेंबरमध्ये गणपतीपूर्वी डांबर प्रकल्प सुरू होतात. त्यावेळी डांबराने खड्डे बुजविण्याची पक्की कामे पूर्ण करण्यात येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा