सरकारी रुग्णालयांत कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची चालढकलीबाबत कितीही ओरड केली तरी परिस्थितीत फारसा बदल होत नाही. सोमवारी रात्री याचा पुन्हा प्रत्यय आला. मालेगाव येथील एक रुग्ण ओटीपोटात दुखत असल्याने रात्री ११ वाजता संदर्भ रुग्णालयात पोहचला. मात्र त्याला दाखल न करता त्याची बोळवण जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आली. जिल्हा रुग्णालयाने त्याला थेट बाहेरचा रस्ता दाखविला. मंगळवारी सकाळी दहा तासानंतर वरिष्ठांना लक्ष दिल्यानंतर त्यांना दाखल करून घेण्यात आले. या प्रकाराबाबत विचारणा केल्यावर संदर्भ रुग्णालयाने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे बोट दाखवत आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.

मालेगावच्या दरेगांव परिसरात शेतमजुरी, दगडकाम करणारे संजय काकळीज (४५) यांना गेल्या काही दिवसांपासून लघु शंकेचा त्रास सुरू होता. या बाबत मालेगावच्या खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर आठ दिवसांपासून उपचार सुरू होते. शस्त्रक्रिया केल्यावर तो त्रास थांबेल, असा पर्याय डॉक्टरांनी सुचविला. मात्र काकळीज यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने डॉक्टरांनी त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार येथील संदर्भ रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करून घ्यावे, असे शिफारस पत्रही त्यांनी दिले. त्यानुसार काकळीज यांनी पत्नी व मुलांसमवेत सोमवारी रात्री १० वाजता नाशिक गाठले. ११ वाजता संदर्भ रुग्णालयात आल्यावर डॉक्टरांकडील ते पत्र, आपल्याला होणारा त्रास याबद्दल माहिती दिली. रात्रपाळीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘कोणी काहीही लिहून देते, कुठूनही येता असे सांगत आता खाटा शिल्लक नसल्याने दाखल करून घेता येणार नाही, सकाळी या’ असे सांगितले. नातेवाईकांनी ‘काकळीज यांची अवस्था पहा, त्यांना असह्य़ वेदना होत असून काही उपचार करा,’ अशी विनंती केली. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.
जिल्हा रुग्णालयात तरी किमान प्राथमिक उपचार सुरू होतील या आशेने काकळीज कुटुंबियांनी रात्री १२ नंतर जिल्हा रुग्णालय गाठले.
त्यावेळी रात्रपाळीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांने ‘जिल्हा रुग्णालय म्हणजे तुम्हाला धर्मशाळा वाटली का?’ असे सुनावत बाहेरच थांबवून ठेवले. संपूर्ण रात्र जिल्हा रुग्णालयाच्या आवारात काढल्यानंतर ते पुन्हा एकदा संदर्भ रुग्णालयात गेले. रात्रीची पुनरावृत्ती होत असल्याने काकळीज यांनी सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. मंगळवारी सकाळी ९ वाजता त्यांनी मध्यस्ती केल्यावर रुग्णास दाखल करून घेण्यात आले. दाखल केल्यानंतर काही औषधे बाहेरून मागविण्यात आली. रुग्णाची तपासणी न करता केस पेपरवर ‘किडनी स्टोन’चे निदान करत उपचारही सुरू करण्यात आले.
या एकूणच प्रकाराबाबत संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत सोनार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रुग्णाला लघवीचा काही त्रास असल्याचे सांगितले. ‘युरोलॉजिस्ट’ आल्यावर उपचार सुरू करण्यात आले. वास्तविक या रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार होणे अपेक्षित होते. ही सर्व कामे प्राथमिक स्तरावरील आहेत. त्यावर त्याच ठिकाणी उपचार होणे गरजेचे आहे. यासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. आपल्याकडे रात्री खुपच अत्यावस्थ स्थिती असेल आणि तातडीने उपचार होऊ शकत असतील तरच दाखल करून घेण्यात येते, असा खुलासा त्यांनी केला.

Story img Loader