‘अर्धनागरीकरण’ हा विषय क्लिष्ट चर्चेचा, आकडेवारीचा आणि तज्ज्ञांचा आहे, असा समज घेऊन काही श्रोते आले असते तर त्यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला असता. कारण अर्धनागरीकरणावरील चर्चेत बाजारपेठेबरोबर देशावरून कोकणात स्थलांतर करणारी माकडे आणि ‘पावभाजी संस्कृती’ अर्थात त्यातील प्रत्येक घटक भाजीची स्वतंत्र चव घालवून एक सरमिसळ नवीनच (बे)चव निर्माण करणाऱ्या संस्कृतीपर्यंत अनेक रंजक मात्र अत्यंत उद्बोधक चर्चानी परिसंवादाचा पहिला दिवस गाजवला.
शहर नियोजन, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, अर्धनागरीकरणाच्या समस्यांना बळी पडणाऱ्यांच्या समस्या सोडवणाऱ्या संस्थेचे संस्थाचालक, नाटय़ दिग्दर्शक अशा समाजातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी ‘हॉटेल ताज विवांता’ची ‘बॉलरूम’ खुलली होती. निमित्त होते, ‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांनी आयोजित केलेल्या ‘बदलता महाराष्ट्र’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचे! या पर्वात ‘महाराष्ट्रासमोरील अर्धनागरीकरणाचे आव्हान’ या सर्वासाठीच्या जिव्हाळ्याच्या विषयातील काही पैलूंची चर्चा पहिल्या दिवशी, बुधवारी झाली. या परिसंवादाचे वैशिष्टय़ म्हणजे हा परिसंवाद केवळ वक्त्यांपुरता मर्यादित न राहता श्रोत्यांमध्येही परिसंवादाच्या विविध विषयांबाबत चर्चा सुरू होती.
‘लोकसत्ता’ने ‘बदलता महाराष्ट्र’च्या पहिल्या पर्वात शिक्षण हा विषय घेतला होता. त्या पाश्र्वभूमीवर अर्धनागरीकरण आणि त्या संबंधीची आव्हाने या विषयाचे औत्सुक्य सगळ्याच श्रोत्यांना होते. श्रोत्यांमध्ये सारस्वत बँकेच्या पदाधिकाऱ्यांपासून नगरसेवक, अर्धनागरीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत विविध संस्थांच्या माध्यमातून काम करणारे संस्थाचालक यांचा समावेश असल्याने परिसंवादाचे पहिले सत्र सुरू होण्याआधीच विविध विषयांवर चर्चा रंगली होती. मुंबईतील रस्ते किती खराब आहेत, या मुद्दय़ावरून सुरू झालेली श्रोत्यांमधील चर्चा इतर शहरांतील रस्त्यांची परिस्थिती ऐकल्यानंतर. ‘त्यापेक्षा मुंबईतील रस्ते खूपच चांगले आहेत’, या मुद्दय़ावर येऊन थांबली आणि पहिल्या सत्राला सुरुवात झाली.‘अशास्त्रीय नागरीकरणाचे परिणाम’ या पहिल्या सत्राचा विषय श्रोत्यांमधील सगळ्यांनाच खूपच चांगला परिचयाचा असल्याने वक्त्यांपेक्षा प्रेक्षकांमध्येच एक ऊर्जा सळसळत होती. जसजसे अशास्त्रीय नागरीकरणाचे परिणाम या वक्त्यांच्या तोंडून समोर यायला सुरुवात झाली, तशी श्रोत्यांमध्येही दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. वक्त्यांची मनोगते पूर्ण होण्याआधीच अनेकांनी आपले प्रश्न कागदावर लिहून निवेदकांपर्यंत पोहोचतील, याची काळजी घेतली होती.
हे चर्चासत्र झाल्यानंतर चहापानाच्या वेळेत अनुत्तरित राहिलेल्या काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी श्रोत्यांनी वक्त्यांना गराडा घातला होता. विशेष म्हणजे या तीनही वक्त्यांनी चहापानाच्या वेळेतही चर्चा पुढे ठेवली.
पहिल्या दिवसाचे दुसरे सत्र गाजवले ते नाटय़दिग्दर्शक अतुल पेठे यांनी! आमदार आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश कुलकर्णी यांच्यासह पेठे यांनी अर्धनागरीकरणाची संस्कृती या विषयावर झोड उठवली. प्रेक्षकांमधूनही त्यांच्या वाक्यावाक्याला दाद मिळत होती. ‘अर्धनागरीकरणाची संस्कृती म्हणजे पावभाजी संस्कृती आहे’, या त्यांच्या वाक्याला तर टाळ्यांचा कडकडाट झाला. अतुल पेठे अशी फटकेबाजी करत असताना नीलम गोऱ्हे यांनी त्यांना असलेल्या मर्यादांमध्येही अत्यंत मुद्देसूदपणे आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी मांडलेल्या काही मुद्दय़ांबाबत प्रेक्षकही अंतर्मुख झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा