युवा, सौजन्य –
वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी पक्षाने तिकीट नाकारलं असतानाही तो अपक्ष म्हणून निवडून आला आणि नगरसेवक झाला. आता तो चाललाय जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत राजकारणाबद्दलची आपली मतं मांडण्यासाठी..
लोकशाही व्यवस्थेत सत्ताकारणावर अंकुश ठेवायचा असेल तर राजकारण अपरिहार्य ठरते. मात्र बहुतेक उच्चशिक्षित तरुणांना राजकीय क्षेत्रात काम करणे कमीपणाचे वाटते. त्यामुळे त्यापासून चार हात दूर राहणेच ते पसंत करतात. त्यामुळे नको त्या प्रवृत्ती राजकारणात बहुसंख्येने सक्रिय राहतात आणि लोकशाही व्यवस्थेच्या आडून प्रत्यक्षात सरंजामशाहीच राज्य करीत राहते. शाळा महाविद्यालयात टवाळक्या करणारे, अभ्यासात जेमतेमच असणारे संसदीय मार्गाने निवडून येऊन लोकप्रतिनिधी बनतात. शहराचे, राज्याचे अथवा देशाचे धोरण ठरवितात आणि त्यांच्यापेक्षा किती तरी हुशार असणारे त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात धन्यता मानतात. भारतीय लोकशाहीचे हे अध:पतन रोखायचे असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधिमंडळ ते थेट संसदेपर्यंत सर्वच स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून उच्चशिक्षित तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होणे गरजेचे आहे.
चार वर्षांपूर्वी बदलापूर शहरात कॅ. आशीष दामले या तरुणाने ही हिंमत दाखवली. अमेरिकेतून पायलट प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून परतलेल्या अवघ्या २२ वर्षांच्या आशीष पुढे तेव्हा करिअरसाठी खूप चांगले पर्याय होते. शिवाय वडिलोपार्जित व्यवसायही होता. मात्र घरात राजकीय पाश्र्वभूमी असल्याने त्याने नगरपालिका निवडणुकीत स्वत:ला अजमवायचे ठरविले. त्यानुसार त्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे रीतसर तो ज्या विभागात राहतो, त्या बेलवली प्रभागातून तिकीटही मागितले. मात्र या राजकीय लढाईत तुझा निभाव लागणार नाही, असे कारण पुढे करीत त्याला तिकीट नाकारण्यात आले. अर्थात आशीष तसेच त्याच्या समवयस्क मित्रांना पक्षाने सांगितलेले कारणे पटली नाहीत. राजकारणात आपण अननुभवी असू पण हेतू तर चांगले आहेत, यावर त्यांचा विश्वास होता. मग आशीष मागे हटला नाही. त्याने अपक्ष म्हणून निवडणुकीत स्वत:ला आजमविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निवडणूक लढवून तो जिंकूनही आला आणि वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी तो नगरसेवक झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा