मुंबई परिसरात घराचा शोध घेताना अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत शेवटचा पर्याय असणारे बदलापूर आता मुंबई परिघातील सर्वात वेगाने वाढणारे शहर ठरले आहे. गेल्या वर्षभरात शहरात तब्बल नऊ हजारांहून अधिक मालमत्तांचे खरेदी-विक्री व्यवहार झाले. त्यापोटी शासनास १९५० कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक विक्रीतून प्राप्त झाला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार बदलापूर शहराची लोकसंख्या १ लाख ७५ हजार ५१६ इतकी नोंदवली गेली असली तरी नागरीकरणाचा वेग पाहता आता या शहराच्या लोकसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. दहा वर्षांपूर्वी-२००१ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार बदलापूर शहराची लोकसंख्या ९६ हजार ७०० इतकी होती. दहा वर्षांत शहराची लोकसंख्या जवळपास दुप्पट झाली आहे. याच गतीने २०२१ मध्ये बदलापूर शहराची लोकसंख्या सहजपणे चार लाखांच्या घरात जाणार आहे.मुंबई-ठाण्याच्या तुलनेत घरांच्या स्वस्त दरात उपलब्ध असणाऱ्या सदनिका आणि ठाणे जिल्ह्य़ातील इतर शहरांपेक्षा मुबलक पाणी मिळण्याची शाश्वती यामुळे कनिष्ठ मध्यमवर्गीय घरासाठी बदलापूरला पसंती देत आहेत. गेल्या वर्षभरात झालेल्या एकूण नऊ हजार मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांपैकी २५ टक्के व्यवहार जमिनींचे तर उर्वरित सदनिकांचे आहेत. म्हणजे वर्षभरात अंदाजे सात हजार सदनिकांची खरेदी-विक्री बदलापूरमध्ये झाली.
पालिकेस मिळाले १९ कोटी, ८३ लाख
मुंबई महानगर प्रदेशातील बदलापूर शहराच्या वाढीची दखल शासनानेही घेतली असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली. मुद्रांक शुल्कापोटी मिळणाऱ्या महसुलाच्या एक टक्का रक्कम शासन पालिकांना विकास निधी म्हणून देत असते. त्यानुसार अलीकडेच गेल्या वर्षीच्या महसुलापोटी बदलापूर पालिकेस १९ कोटी ८३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. अर्थात तो पुरेसा नाही. कारण बदलापूर शहरालगत, मात्र पालिका हद्दीबाहेरही वेगाने मोठमोठी गृहसंकुले उभारली जात आहेत. त्यामुळे शासनाने बदलापूर शहरासाठी विशेष विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला असल्याची सूत्रांनी दिली.
स्थलांतर
चार दशकांपूर्वी मुंबईतील दादर-गिरगांव, परळ परिसरातील रहिवासी अपुरी जागा तसेच घरांच्या वाढत्या किमतीमुळे पश्चिम रेल्वेवरील विलेपार्ले, जोगेश्वरी; तर मध्य रेल्वेवरील ठाणे, डोंबिवली, कल्याण भागात स्थलांतरित झाले. मुंबईचे घर विकून आलेल्या पैशांतून या भागात तुलनेने स्वस्त आणि मुंबईच्या तुलनेत मोठे घर घेऊन उर्वरित रक्कम भविष्याची पूंजी म्हणून ठेवणारे अनेकजण होते. आता ठाणे-डोंबिवलीकरही तोच कित्ता गिरवीत बदलापूरला राहण्याचा पर्याय स्वीकारू लागले आहेत.
..अन्यथा बदलापूर होईल बकाल
बदलापूर शहराची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असून त्याचा विद्यमान सोयीसुविधांवर ताण पडू शकतो. त्यामुळे दीर्घकालीन म्हणजेच ५० वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधांची आखणी करीत असल्याचा दावा स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी केला  आहे. बदलापूर शहर चौपदरी रस्त्याने मुंबईला जोडण्यात येत आहे. या रस्त्यांची कामे पूर्ण झाली की बदलापूरहून सव्वा तासात मुंबईला जाता येईल. बारवी विस्तारीकरणानंतर उपलब्ध होणाऱ्या जादा जलसाठय़ापैकी काही पाणी बदलापूरसाठी आरक्षित असेल. पाटबंधारे खात्याच्या भोज धरणाचे पाणीही शहरवासीयांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय शिरवली, इंदगांव येथील जलाशयांवरही छोटी धरणे बांधून भविष्यकालीन वाढत्या पाणीपुरवठय़ाची सोय केली जाणार आहे. अर्थात हे सारे अद्याप कागदावरच आहे. प्रत्यक्षात सध्या बदलापूरवासीयांना अनेक समस्या भेडसावत आहेत. बदलापूरला पूर्व-पश्चिम दोन्हीकडे स्कायवॉक बांधून झाले, पण अद्याप रेल्वे फाटकास ते जोडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना अजूनही जीव धोक्यात घालून रेल्वे मार्ग ओलांडावा लागत आहे. मुबलक पाणी हे या शहराचे वैशिष्टय़. मात्र यंदा भर पावसाळ्यात बदलापूरवासीयांना पाणीटंचाईच्या निषेधार्थ मोर्चा काढावा लागला होता. कागदावरील योजना वेळेत साकारल्या नाहीत, तर बदलापूर बकाल होण्याची भीती सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

Story img Loader