निवासाची योग्य व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी अधिकारी राहत नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन बदलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची प्राधान्याने सोय करण्यात येत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात १९१९ पासून कार्यरत बदलापूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची मध्यंतरीच्या काळात बरीच पडझड झाली होती. तसेच अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णसेवेवरही परिणाम झाला होता. आता अखेर उशिराने का होईना हे प्राथमिक आरोग्य केंद्र कात टाकणार असून त्यासाठी तब्बल १ कोटी ७७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
 या नव्या एक मजली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत महिला तसेच पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग असणार आहेत. शहरीकरणाचे लोण थेट बदलापूर गावात येऊन पोचले असल्याने या आरोग्य केंद्रात सर्व अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यात शस्त्रक्रिया कक्ष ते शवविच्छेदन आदी वैद्यकीय सुविधा असणार आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी ८ लाख २४ हजार तर कर्मचारी निवासस्थानासाठी २१ लाख ३५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने इमारतीचे काम सुरू असून येत्या सहा महिन्यांत आरोग्य केंद्र या नव्या इमारतीत कार्यान्वित होईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा