शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर काही निकटच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरेदाखल झालेल्या सुनील बागूल यांनी १४ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री तसेच पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे. या मेळाव्यात बागूल समर्थक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना शिवसेनेने पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्याचा मुहूर्त प्रलंबित ठेवत या घडामोडींची कमीतकमी झळ बसावी, असे नियोजन केल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. या पाश्र्वभूमीवर, बागूल हे शिवसेनेला मोठे खिंडार पाडतात, की उलट शिवसेनाच बागूलांना कात्रजचा घाट दाखविते, ते लवकरच स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेतील जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांमधील वादाची परिणती माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, माजी महानगरप्रमुख अर्जुन टिळे व महिला आघाडीच्या पदाधिकारी शोभा मगर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशात झाली. तेव्हापासून शिवसेना आणि राष्ट्रवादीतील या नवनिर्वाचितांमध्ये वाक् युद्ध सुरू आहे. बागूल यांच्याजवळ कार्यकर्त्यांचा मोठा संच असल्याने त्यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्याचे निमित्त साधून १४ फेब्रुवारी रोजी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी डोंगरे वसतीगृह वा तत्सम भव्य आकाराचे मैदान शोधण्याचे कामही सुरू झाले आहे. या मेळाव्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड उपस्थित राहणार असल्याची माहिती खुद्द बागूल यांनी दिली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी बागूल समर्थकांनी सुरू केली आहे. पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या या पक्ष प्रवेश सोहळ्याचा फटका आपणास बसू नये म्हणून शिवसेनेने खबरदारीचे उपाय करण्यास सुरूवात केली आहे.
सहा महिन्यापासून शिवसेनेने महानगर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केलेली नाही. सेनेच्या नेत्यांनी अनेक प्रमुख आजी-माजी पदाधिकाऱ्यांना चांगली पदे देण्याचे आश्वासन दिले आहे. त्या आशेवर काही जण अद्याप शिवसेनेत असले तरी त्यांनी इतर कोणत्या पक्षात जाऊ नये म्हणून ही यादी जाहीर केली जात नसल्याचा आरोप बागूल यांनी केला. एका पदासाठी अनेकांना शब्द दिला असल्याने ते सर्व नाराज होतील, अशी धास्ती सेनेच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे यादी जाहीर केल्यास अनेक पदाधिकारी व शिवसैनिक पक्षांतर करतील. या एकाच भीतीमुळे पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली जात नसल्याकडे बागूल यांनी लक्ष वेधले. तथापि, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची यादी या सप्ताहात जाहीर होण्याची शक्यता असल्याचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगितले. बागूल समर्थकांच्या राष्ट्रवादी प्रवेश सोहळ्याचा शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण, सेना सोडल्यानंतर त्यांनी काढलेल्या पहिल्याच मोर्चाला मिळालेल्या अल्प प्रतिसादावरून त्यांची ‘शक्ती’ किती आहे, याचीही अनुभुती नाशिककरांना आल्याची खिल्ली शिवसेनेने उडविली आहे. प्रभागनिहाय शिवसैनिकांच्या बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांची प्राथमिक यादी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी सुपुर्द करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच नुतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर होईल, असे सांगितले जाते. बागूल यांच्या समवेत काम करून कोणत्याही शिवसैनिकाचे भले झालेले नाही. यामुळे त्यांच्या समवेत कोणी राष्ट्रवादीत जाणार नाही, असेही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे यादी जाहीर करण्याच्या मुद्यावरून बागूल यांनी सेनेतील इतर मासे गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Story img Loader