शिकाऱ्यांचे त्रिकूट सक्रिय
मेळघाटातील गुगामल वन्यजीव विभागाच्या ढाकणा वनपरिक्षेत्रात तीन महिन्यांपूर्वी एका वाघाच्या शिकारीत मध्य प्रदेशातील बहेलिया टोळीचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून स्थानिक शिकारी आणि व्यापारी आणि आंतरराज्यीय तस्कर यांचे त्रिकूट मेळघाटात पुन्हा सक्रिय झाल्याने वन्यजीव संरक्षणासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वन अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या पथकाने ६ संशयित शिकाऱ्यांना मंगळवारी अटक केली. या शिकाऱ्यांकडून वाघांना शिकारीसाठी वापरण्यात येणारा लोखंडी सापळा, चाकू, भ्रमणध्वनी संच, टॉर्च असे साहित्यदेखील जप्त करण्यात आले. आरोपींनी ढाकणा वनपरिक्षेत्रात एका वाघाची शिकार केल्याची कबुली दिली आहे. आरोपींच्या विरुद्ध भारतीय वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२, भारतीय वनकायदा १९२७ आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक के.पी. सिंह गेल्या दोन दिवसांपासून मेळघाटात तळ ठोकून होते. अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश उदय वर्मा यांच्या नेतृत्वाखाली सहायक वनसंरक्षक ए. के. गोस्वामी, वनपाल सुनील वाकोडे, वनपरिक्षेत्र अधिकारी डी.जी. देशमुख, जे.एम. सुरजुसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. मेळघाटात गेल्या काही वर्षांपासून बहेलिया टोळीने शिरकाव केल्याची माहिती मिळत होती, कारवाई मात्र होत नव्हती. या कारवाईमुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्प यंत्रणेने समाधान व्यक्त केले असले, तरी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मेळघाटात स्थानिक शिकारी, वन्यजीवांच्या अवयवांचा व्यापार करणारे आणि राज्याबाहेरून सूत्रे हलवणारे तस्कर यांच्या समन्वयातून एक मोठी टोळी तयार झाली आहे. ‘कटनी गँग’ या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या शिकाऱ्यांच्या टोळीचे स्थानिक शिकारी आणि व्यापारी यांचे संबंध असल्याचे गेल्या काही घटनांमधून स्पष्ट झाले होते. या कारवाईने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
मेळघाटात बहेलिया टोळीचा पुन्हा शिरकाव हे गंभीर संकेत मानले जात आहेत. स्थानिकांच्या मदतीने शिकार करून मध्यप्रदेशात जाणाऱ्या रेल्वे आणि रस्ते मार्गे त्यांच्या अवयवांची विल्हेवाट लावणे सोपे जात असल्याने या टोळीच्या कारवाया वाढल्या आहेत. या टोळीने तीन महिन्यांपूर्वी ज्या ठिकाणी एका वाघाची शिकार केली होती, त्या ठिकाणी केवळ वाघाची काही हाडे आणि केसांचा पुंजका आढळून आला आहे. रक्ताने माखलेले दगडही दिसले. अत्यंत निर्दयतेने वाघाला सापळयात अडकवून त्याची शिकार केली गेली. लोखंडी सापळे वापरण्याची पद्धत बहेलिया टोळीची आहे. मेळघाटातील दहा गावांच्या पुनर्वसनानंतर वाघांच्या अधिवासाचे क्षेत्र विस्तारत असताना शिकाऱ्यांनी त्याचा फायदा उचलावा, हे गंभीर संकट मानले जात आहे.