घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड येथील ३०० ते ३५०जणांच्या नावावर कोटय़वधीचे कर्ज उचलल्याप्रकरणी आरोपींचा अटकपूर्व जामीन, तसेच गुन्ह्य़ासंदर्भातील पुनर्विचार अर्ज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. कापडणीस यांनी फेटाळून लावला.
पिंपरखेडच्या ३०० ते ३५०जणांच्या नावावर महाराष्ट्र बँकेच्या कुंभार पिंपळगाव शाखेतील व्यवस्थापक व ग्रामसेवक, तलाठी तसेच पांडुरंग भांगे, रामकिसन सानप, अर्जुन सानप, पांडुरंग शिरसाठ, शेख उस्मान तांबोळी यांनी संगनमताने बनावट प्रकरणे करून कर्ज उचलल्याचा आरोप आहे. काहीजणांकडे शेतजमिनी नसतानाही बनावट सात-बारा उतारा तयार करून, तसेच काही मयत व्यक्तींच्या नावावरही कर्ज उचलण्यात आल्याचा आरोप आहे. या संदर्भात दिगंबर जाधवर यांनी पोलीस व राज्य सरकारकडे तक्रार अर्ज करून तपासाची मागणी केली होती. परंतु या बाबत पोलीस दुर्लक्ष करीत असल्यामुळे घनसावंगी न्यायालयात अर्ज केला होता. घनसावंगीचे प्रथमवर्ग न्यायदडांधिकारी भन्साळी यांनी गेल्या ७ नोव्हेंबरला या प्रकरणी गुन्हा नोंदवून हे प्रकरण चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश दिले. या आदेशाविरुद्ध आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज करून पुनर्विचार आणि अटकपूर्व जामिनाची विनंती केली होती.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या राजकारणातून खोटा गुन्हा करण्यात आल्याचे निवेदन आरोपींनी के ले होते. न्या. कापडणीस यांनी स्थगिती व अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले.
या प्रकरणात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील सुरेश साळुंके व अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मुकुंद कोल्हे यांनी काम पाहिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा