कळमनुरी तालुक्यातील रामेश्वरतांडा घरकुल प्रकरणात बीपीएल लाभार्थी कार्डाच्या गैरव्यवहारप्रकरणी कळमनुरीचे गटविकास अधिकारी दीपक चाटे, अभियंता सातव, सरपंच, ग्रामसेवकासह इतरांवर न्यायालयाच्या आदेशावरून आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. यात गटविकास अधिकारी व अभियंत्याचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला, तर सरपंच, ग्रामसेवकासह सातजणांचा जामीन हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने नामंजूर केला.
घरकुल योजनेतील फिर्यादी साहेबराव अमृता राठोड याचा बीपीएल कार्ड क्रमांक ३५५१ होता. हा क्रमांक वापरून साहेबराव बळीराम जाधव याच्या नावावर फिर्यादीला इंदिरा आवास योजनेत घरकुल मंजूर केल्याचा आरोप फिर्यादीने केला होता. यात सरपंच संगीता गणेश चव्हाण, ग्रामसेवक के. जी. खंदारेसह १०जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सरपंच चव्हाण, ग्रामसेवक खांदारेसह ५ आरोपींना १९ जानेवारीला अंतरिम जामीन मिळाला. दि. २२ जानेवारीला हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयात अंतिम सुनावणीच्या वेळी सरपंच, ग्रामसेवक, सरपंचाचे पती, भाऊ यांच्यासह सातजणांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने नामंजूर केला. फिर्यादी पक्षातर्फे अ‍ॅड. पंजाब चव्हाण व सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. टेकनूर यांनी काम पाहिले.