बंदी असतानाही गुटखा उत्पादन केल्यासंदर्भातील मुख्य आरोपी केतन शहा याचा अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायाधीश (द्वितीय) ए. एन. करमरकर यांनी फेटाळला. गेल्या २६ जूनला येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत छापा टाकून अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व पोलिसांनी गुटख्याचे अवैध उत्पादन उघडकीस आणले. या प्रकरणी केतन शहासह सहाजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी यापूर्वी अटक केली. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांची जामिनावर सुटका केली. एक आरोपी बेपत्ता आहे, तर केतन शहा याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सहा आरोपींच्या म्हणण्यावरून शहा यास आरोपी करणे अयोग्य आहे. त्याने औरंगाबाद रस्त्यावरील गुटखा उद्योग राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर बंद केला आहे. तसेच अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत पोलिसांनी जप्त केलेला माल हा गुटखा नसून तेथे सापडलेल्या अन्य साहित्यास बाजारात बंदी नाही. त्यामुळे शहाचा अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी विनंती त्यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली.
सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील मुकुंद कोल्हे यांनी न्यायालयात सांगितले, की संबंधित ठिकाणी १ कोटी ९ लाख रुपयांची तंबाखू, पाऊच, सुगंधी द्रव्य, पाच पॅकिंग मशीन आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले. राज्यात गुटखा बंदी असतानाही हा उद्योग अन्य ठिकाणी कोठे सुरू आहे का? याची चौकशी करणे आवश्यक आहे. तसेच हा कच्चा माल कोठून आणण्यात आला? हा गुटखा नेमका कोठे विकण्यात येतो? आदी तपास करणे आवश्यक आहे. जप्त केलेला माल सार्वजनिक व मानवी आरोग्यासाठी अपायकारक आहे. शहा याने औरंगाबाद रस्त्यावरील गुटखा उद्योग बंद केला असला, तरी अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत नोकरांच्या नावे जागा भाडय़ाने घेऊन हा दुसरा उद्योग सुरू केला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपी श्रीमंतीच्या व राजकीय ओळखीच्या बळावर तपासात अडथळा आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर करू नये, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
या युक्तिवादानंतर न्यायालयाने शहाचा अटकपूर्व जामीन फेटाळला. सकृतदर्शनी पुराव्यावरून या गुन्हय़ातील तापासासाठी पोलिसांना शहा याची आवश्यकता असल्याने त्यास ताब्यात घेणे आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले. अन्न व औषधी प्रशासनातील अन्न निरीक्षक प्रज्ञा सुरवसे यांच्या फिर्यादीवरून या संदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे या प्रकरणी तपास देण्यात आला.

Story img Loader