महिला पोलिसास दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेल्या अक्षय शिवाजी कर्डिले याची आज, गुरुवारी न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. अक्षय हा भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा मुलगा आहे.
गेल्या २८ नोव्हेंबरला पत्रकार वसाहत चौकात वाहतुकीस अडथळा होईल, असे वाहन (एमएच १६ एव्ही ९९९) उभे करून ते बाजूला काढण्यास सांगितल्याचा राग येऊन, चालक बाबासाहेब यदू कर्डिले व अक्षय कर्डिले (दोघेही रा. बुऱ्हाणनगर) या दोघांनी वाहतूक शाखेच्या महिला पोलीस प्रमिला गायकवाड यांना दमदाटी करून त्यांच्याशी उद्धट वर्तन केले, या कारणावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बाबासाहेब कर्डिले याचा अटकपूर्व जामीनअर्ज सुरुवातीला न्यायालयाने फेटाळला होता, नंतर पोलिसांनी त्याला अटक केली, त्याची दि. २ रोजी जामिनावर मुक्तता झाली. परंतु गेला आठवडाभर अक्षय हा फरार होता. तो आज स्वत:हून बाल गुन्हेविषयक न्यायालयापुढे हजर झाला. साडेसतरा वय असल्याचा दावा त्याने केला. न्यायालयाने त्याला १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. त्याच्या वतीने वकील अभिषेक भगत व वकील महेश तवले यांनी काम पाहिले.

Story img Loader