२०१० मधील एका गुन्ह्यासंदर्भात येथील जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात सोमवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. या खटल्याच्या पुढील तारखांना गैरहजर राहण्याबद्दलचा त्यांचा विनंती अर्जही मान्य करण्यात आला असून या खटल्याची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे.
२८ ऑक्टोबर २०१० रोजी शहरात मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भातील दाखल खटल्यात राज अद्यापपर्यंत न्यायालयात उपस्थित झाले नव्हते. सोमवारी सकाळी ११ वाजता राज न्यायालयात उपस्थित झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. पुढील तारखांना गैरहजर राहण्यासंदर्भात राज यांच्या वतीने करण्यात आलेला अर्जही मंजूर करण्यात आला. जळगावच्या आंदोलनात राज यांचा सहभाग नव्हताच, त्यामुळे खटल्यातून त्यांचे नाव वगळण्यात यावे असा विनंती अर्जही न्यायालयाने दाखल केला असून त्यावर १५ जून रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयात ठाकरे यांच्या वतीने अ‍ॅड. सयाजी नागरे व अ‍ॅड. केतन ढाके यांनी काम पाहिले. राज न्यायालयात उपस्थित झाले तेव्हा परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.