शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कर्तृत्व इतके मोठे होते की, ते तीन तासाच्या चित्रपटात मांडणे अवघड होते. त्यांचा करारीपणा, नेतृत्व आदी पैलूंवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न ‘बाळकडू’मधून करण्यात आला आहे. मराठी माणसाच्या प्रश्नावर लढणारे, प्रसंगी त्यांना डोसही पाजणाऱ्या बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे ही ‘बाळकडू’ चित्रपटनिर्मितीमागील संकल्पना असल्याची भावना या चित्रपटाचे दिग्दर्शक व कलावंतांनी व्यक्त केली.
संजय राऊत प्रस्तुत बाळकडू म्हणजे केवळ गर्जना नाही तर प्रत्यक्ष बाळासाहेबांना अनुभवता येईल. बाळकडू म्हणजे मुंबईतील सामान्य माणसाची कथा आहे. त्याचा संघर्ष आणि त्या संघर्षांस लाभलेली बाळासाहेबांची प्रेरणा यावर आधारित ही कथा आहे. पडद्यावर बाळासाहेबांनी साधलेला संवाद व त्यातून दिलेले विचारांचे बाळकडू थक्क करणारे ठरेल, असा विश्वास शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिग्दर्शक अतुल काळे, प्रमुख कलाकार उमेश कामत व नेहा पेंडसे यांनी व्यक्त केला. त्यांच्या वाढदिवशी हा चित्रपट प्रदर्शित व्हावा यादृष्टीने कामाचे नियोजन करण्यात आले आणि २३ जानेवारीपूर्वी चित्रपट तयार करण्यात यश आल्याचे काळे यांनी नमूद केले. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाशी बाळकडूची कथा साधम्र्य साधणारी आहे काय, यावर बोलताना त्यांनी तो चित्रपट एका व्यक्तीच्या प्रश्नावर आधारित होता. बाळकडूचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. मुंबईत आजही मराठी माणसाचा आवाज दाबला जातो. मराठी जनांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आधारलेला हा चित्रपट आहे. चित्रपटास कर सवलतीची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठी प्रेक्षक आता चोखंदळ झाला आहे. विविध कंगोरे लक्षात घेऊन तो चित्रपटाची निवड करतो. हिंदी चित्रपट पाहण्यासाठी ५०० रुपये मल्टिप्लेक्समध्ये खर्च केला जातो. मराठी चित्रपटासाठी त्यांना १०० रुपये खर्च करणे फारसे अवघड नाही. महाराष्ट्रातील मराठी जनांना डोळ्यासमोर ठेवून निर्मिलेला हा चित्रपट हिंदी भाषेत काढण्याचा अद्याप विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
चित्रपटात आपण नायक असलो तरी बाळासाहेब हेच खरे महानायक आहेत अशा शब्दात उमेश कामत यांनी भावना व्यक्त केली. बाळासाहेबांची भूमिका कोणी करू शकत नाही. केवळ त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपण पेलल्याचे अतुलने सांगितले. नेहा पेंडसे हिने चित्रपटात मुख्य भूमिका उमेशची असली तरी आपणास मिळालेल्या भूमिकेबद्दल आपण समाधानी असल्याचे नमूद केले. चित्रपटात नायकाच्या भूमिकेमागे तितक्याच इतर मजबूत खांबांची गरज असते. ते काम आपण केल्याचे तिने सांगितले. चित्रपटात चार गाणी असून ती अतिशय वेगळ्या धाटणीने सादर करण्यात आली आहेत. पोवाडय़ात नेहमी पारंपरिक वाद्यांचा वापर केला जातो. परंतु, हा पोवाडा शाळेत होणार असल्याने त्यासाठी बाकांचा वापर केला गेला. मराठीतील सुरेश भट यांचे गीत अतिशय वेगळ्या धाटणीने सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अतुल काळे दिग्दर्शित या चित्रपटाच्या निर्मात्या स्वप्ना पाटकर आहेत. चित्रपटात टिकू तलसानिया, प्रसाद ओक, सुप्रिया पाठारे, पुष्कर क्षोत्री, शरद पोंक्षे व नवोदित कलावंतांची साथ लाभली आहे. अजित-समीर जोडीने संगीताची बाजू सांभाळली आहे. पाश्र्वसंगीत समीर म्हात्रे यांचे तर ध्वनी संयोजन प्रमोद चांदोरकर यांचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा