वाशीम जिल्ह्य़ातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या बालाजी सहकारी सूतगिरणीचे उद्घाटन शनिवारी, २३ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती बालाजी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष बाबाराव खडसे पाटील यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भरीव सहकार्याने गेल्या १७ वर्षांपासून रखडलेले बालाजी सहकारी सूतगिरणीचे काम पूर्णत्वास आले आहे. हा प्रकल्प वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातील व मराठवाडय़ातील हिंगोली जिल्ह्य़ातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरणारा असल्याची माहिती खडसे यांनी दिली. बालाजी सहकारी सूतगिरणीच्या उद्घाटनाचे औचित्य साधून रिसोड तालुक्यातील मांगवाडी येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. विजय कुमार गावीत, अन्न व औषध प्रशासनमंत्री मनोहरराव नाईक, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, वस्त्रोद्योग विभागातील वरिष्ठ अधिकारी, विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन सोहळ्यास व शेतकरी मेळाव्यास जिल्ह्य़ातील शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बाबाराव खडसे पाटील यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा