नगर परिषदेने शहरात पुढील पाच वर्षांत करावयाची विकासकामे, त्यावर अपेक्षित खर्च व नगर परिषदेचे उत्पन्न याचा योग्य ताळमेळ घालून आराखडा तयार करावा. हा आराखडा सर्वसाधारण सभेत मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५ दिवसांत सरकारला सादर करावा, अशा सूचना चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी दिल्या.
चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांच्या उपस्थितीत बीड नगर परिषदेच्या सभागृहात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक झाली.
नगराध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, मुख्याधिकारी व्ही. बी. निलावाड आदी उपस्थित होते. डांगे यांनी सांगितले, की बीड शहराची हद्दवाढ झाली असल्याने नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देताना अपुरे मनुष्यबळ व यंत्रणा यामुळे पालिकेसमोर अडचणी निर्माण होतात. त्या सोडविण्यास पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणे गरजेचे आहे. नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डातील नागरिकांशी समन्वय साधून वसुलीचे प्रमाण वाढविण्यास प्रयत्न करावेत, तसेच जनतेनेही या कामी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. नगरसेवक, सदस्य, पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Story img Loader