आपल्या कुंचल्याने व वक्तृत्वाने मराठी मनांवर राज्य करणारा आणि ‘हिंदूत्वाचा झंझावात’ असे वर्णन केले जाते त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला पुण्यात, तोही सदाशिव पेठेत! त्यांचे जन्मस्थान असलेल्या पूर्वीच्या नातू वाडय़ाच्या जागेवर आता सार्थक नावाची इमारत उभी आहे.
प्रबोधनकार ठाकरे हे पूर्वी ३४५ सदाशिव पेठ (सध्याचा ८९६ सदाशिव) येथील नातू वाडय़ामध्ये वास्तव्यास होते. प्रबोधनकारांच्या ‘माझी जीवनगाथा’ आत्मचरित्रामध्ये या वास्तूमध्ये बाळचा जन्म झाला असल्याचा उल्लेख आहे. या घरामध्येच प्रबोधनकारांचा छोटासा प्रेसदेखील होता. ३४५ सदाशिव पेठ हा मूळचा दातार यांचा वाडा. गणेश भिकाजी दातार यांच्या मातुश्री सगुणाबाई यांनी ६ जुलै १८९२ रोजी या वाडय़ाचा काही भाग रामचंद्र कृष्ण नातू यांना विकला. त्यामुळे दातार वाडा हा पुढे नातू वाडा झाला. या दुमजली वाडय़ाच्या तळमजल्याला प्रबोधनकार ठाकरे वास्तव्यास होते. याच घरामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला, अशी माहिती वैकुंठभाई मेहता सहकारी संस्थेतून निवृत्त झालेल्या वसंतराव दातार यांनी दिली. मात्र, वर्षभरातच ठाकरे कुटुंबीय मुंबईला गेल्यामुळे बाळासाहेबांचे जन्मस्थान एवढेच या स्थानाचे महत्त्व आहे. ठाकरे कुटुंबीयांनंतर दा. ग. अभ्यंकर यांचे कुटुंब या घरामध्ये वास्तव्यास होते.
नातू यांच्याकडून १० सप्टेंबर १९८१ रोजी गोिवद नरहरी सिद्धांती यांनी हा वाडा विकत घेतला. तर, रमेश कुवर यांच्याकडे २३ जानेवारी १९८५ रोजी या वाडय़ाची मालकी आली. त्यांनी २००३ मध्ये या वाडय़ाचे रूपांतर सार्थक या इमारतीमध्ये केले. प्रबोधनकारांचे वास्तव्य असलेल्या या ठिकाणी नीलफलकाचे अनावरण करण्यासाठी पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती समितीतर्फे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, मी सरकारी नोकरीमध्ये असल्यामुळे त्या प्रस्तावाला परवानगी दिली नाही, असे रमेश कुंवर यांनी सांगितले.
हो, माझा जन्म तेथेच
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी लिहिलेल्या जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या चरित्राचे प्रकाशन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. त्यावेळी ठाकरे यांच्या जन्मस्थानी वास्तव्यास असलेल्या दा. ग. अभ्यंकर यांनी माझ्याकडे चिठ्ठी देत मला बाळासाहेबांना भेटायचे आहे, अशी इच्छा प्रदर्शित केली होती. ती चिठ्ठी मी बाळासाहेबांना दाखविली. ‘तुमच्या घरामध्ये मी राहात आहे’, असे अभ्यंकर यांनी या चिठ्ठीमध्ये लिहिलेले होते. ‘हो, माझा जन्म तेथेच झाला आहे,’ असे सांगत बाळासाहेबांनी त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला, अशी आठवण डॉ. न. म. जोशी यांनी सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा