शिवम आध्यत्मिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे घेतले जाणारे बलशाली युवा हृदय संमेलन येत्या शुक्रवारपासून (दि. ११) घारेवाडी (ता. कराड) येथील आध्यात्मिक केंद्रावर सुरू होत आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे संमेलनात मार्गदर्शन करणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली.
शिवम् प्रतिष्ठानतर्फे गेल्या ११ वर्षांपासून तीन दिवसांचे बलशाली युवा हृदय संमेलन आयोजित केले जात असून, यंदाचे बारावे म्हणजेच तपपूर्तीचे वर्ष आहे. दि. ११ रोजी संमेलनाचा शुभारंभ जळगावच्या दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेद महाजन यांच्या हस्ते होणार असून, ‘प्रत्येकात स्वामी विवेकानंद’ या  विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. चार सत्रांमध्ये चालणाऱ्या या संमेलनात एसीपीएल सातारचे बबनराव शेळके, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व समाजसेविका सौ. रेणू दांडेकर (दापोली) व प्रयास संस्थेच संस्थापक डॉ. अविनाश सावजी मार्गदर्शन करणार आहेत.
स्वामी विवेकानंद जयंतीदिनी शनिवारी (दि. १२) सकाळी ९ वाजता ‘सद्य:स्थिती व सत्यस्थिती’ या विषयावर डॉ. कुमार सप्तर्षी यांचे व्याख्यान होणार असून, दुपारच्या सत्रात अहमदाबादच्या आयआयटीचे विनय महाजन व सौ. चारूल बडवा यांचे ‘आमचा जीवनप्रवास’ तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे ‘हिंदुस्थानच्या भविष्यासाठी तरुणांना अहवान’ या विषयावर तसेच कोयना प्रकल्पाचे चीफ इंजिनिअर दीपक मोडक यांचे ‘लेकटॅपिंगचे पेललेले आव्हान’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
रविवारी (दि. १३) सकाळी ७ ते ८  या वेळेत परमपूज्य धर्मराजजी प्रभू यांचे इस्कॉन नाम संकीर्तन तसेच, मॅगसेस पुरस्कार प्राप्त सौ. नीलिमा मिश्रा यांचे ‘गोधडीची कहाणी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. इंद्रजित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप कार्यक्रम होणार आहे.