पारनेर तालुक्यातील दुष्काळ नैसर्गिक नसून तो मानवनिर्मित असल्याची टीका ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केली. पुणे जिल्ह्य़ातील नेत्यांमुळेच तालुक्याचे वाळवंट झाले, असे ते म्हणाले.
दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी विखे यांनी जिल्ह्य़ाचा दौरा सुरू केला असून काल (गुरूवारी) त्याची पारनेरमधून सुरूवात केली. सुरूवातीला माजी खासदार शंकरराव काळे यांना श्रद्घांजली अर्पण करण्यात आली. माजी आमदार नंदकुमार झावरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल झावरे, विठ्ठलराव शेळके, सीताराम खिलारी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. भास्करराव शिरोळे आदी यावेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, कुकडी व पिंपळगावजोगा धरणांच्या निर्मितीनंतर दुष्काळ दूर करण्याचे प्रयत्न झाले, मात्र कालवे करताना पुणेकरांचा हस्तक्षेप झाल्याने तालुक्याला या धरणांचा फायदा होऊ शकला नाही़  कालव्यांचे योग्य नियोजन झाले असते तर तालुक्यातील दुष्काळ हटला असता. नगर जिल्ह्य़ातील दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळाले तर तेथे कारखानदारी उभी राहून पुणे जिल्ह्य़ातील कारखानदारी बंद होईल या भीतीने पुणे जिल्ह्य़ातील पुढारी या भागास जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवित असल्याचा आरोपही विखे यांनी केला. तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील पाझर तलाव, कुकडी तसेच पिंपळगाव जोगे धरणाच्या पाण्याने भरून घेण्याची सूचना विखे यांनी केली. या तलावांतून टँकरने पाणीपुरवठा करता येईल, असे मत मांडले.  माजी आमदार नंदकुमार झावरे यांनीही राष्ट्रवादी व पुणे जिल्ह्य़ावर सडकून टिका केली. ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना मराठवाडय़ातील दुष्काळ दिसतो, पण पारनेर तालुक्यातील नाही. तालुक्यातील जनता पुणे जिल्ह्य़ाच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले असून तसे झाले तर तालुक्याला भविष्य राहणार नाही, शेती नष्ट होईल, बेरोजगारांच्या फौजा उभ्या राहतील. आजवर ज्यांनी पुण्याची संगत केली त्यांचे कधीच भले झाले नाही, असेही ते म्हणाले. शैलेंद्र औटी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भास्कर शिरोळे यांनी स्वागत, तर राहुल झावरे यांनी प्रास्ताविक केले.