येथील अत्याचार विरोधी कृती समितीच्यावतीने बलिप्रतिपदेनिमित्त बुधवारी सकाळी ११ वाजता बळीराजा अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात येणार असून या निमित्त विविध मैदानी खेळांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
शिवाजी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून  बळीराजा अभिवादन रॅलीस सुरूवात होणार आहे. ग्रामीण भागात आजही ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे सांगत पुरूष मंडळींना ओवाळले जाते. या बळीराजाचे रुप असलेल्या शेतक ऱ्यास आज आत्महत्या करावी लागत आहे. त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे समितीने म्हटले आहे. दरम्यान, स्वातंत्र्य संग्रामात कधी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. डॉ. आंबेडकरा यांच्या पुतळ्यापासून सुरू होणारी मिरवणूक व रॅली सीबीएस मार्गे टिळकपथ, एम. जी. रोड, मेहेर सिग्नल येथून हुतात्मा स्मारक येथे तिचा समारोप होईल. दरम्यान, मिरवणुकीत लेझीम पथक विविध कला प्रकार सादर करतील. तसेच दांडपट्टा, लाठी-काठीचे प्रात्यक्षिकांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी रॅलीत मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी राहुल तुपलोंढे ९८६०७ ६५०७९, शशीकांत उन्हवणे ९८९०० ०५७८१ यांच्याशी संपर्क साधावा.   

Story img Loader