गोळीबाराचा बनाव
प्रवासी विम्याची रक्कम लाटण्यासाठी गोळीबाराचा बनाव करण्याचा साहीर शेख याचाच डाव होता, लुटीतील १० टक्के रक्कम तो आपल्याला एका अनोळखी व्यक्तीमार्फत देणार होता, असा कबुलीजबाब गुन्ह्य़ातील एक आरोपी सचिन नामदेव पाडळवे याने विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांपुढे दिल्याचे समजले. पोलिसांनी पाडळवेला अटक केलेली नाही, त्यामुळे पोलीस त्याला माफीचा साक्षीदार करण्याची शक्यता आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या सहा जणांच्या पोलीस कोठडीत आज न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. १०) वाढ केली आहे.
या प्रकरणात बांधकाम व्यावसायीक शरद मुथा, त्याचा मुलगा निर्मल व नातलग मोतीलाल लोढा आरोपी आहेत. शरद मुथाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, तर निर्मलच्या अटकपूर्व जामिन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. लोढा याला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. तपासी अधिकाऱ्यांनी काल अटकेत असलेल्या शेख अख्तर अन्वर याचा फौजदारी दंड संहिता कलम १६४ नुसार जबाब नोंदवला जाणार असल्याने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत व्हावी, अशी विनंती केली होती, प्रत्यक्षात त्याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत होती. परंतु एक आरोपी सचिन पाडळवे याचा जबाब नोंदवला, त्याच्या जबाबातून गुन्ह्य़ाचा सूत्रधार साहीर शेख असल्याचे समोर येत आहे. साहीर याने पडळवेच्या मध्यस्थीने कोपरगावच्या तिघा ‘शार्प शुटर’शी संपर्क साधला होता.
कोपरगावचे सुनिल भुजबळ, किरण हजारे व विजय इस्ते या तिघांनी चिंचोळी घाटात गोळीबार केल्यानंतर साहीरने परराज्यात फरार व्हायचे, नंतर पुन्हा साहीरच्या घरावर गोळीबार करायचा, त्याची फिर्याद साहीरशी संबंधित कोणीतरी पोलिसांकडे दिल्यावर कोणीतरी एकजण पाडळवे याच्याशी संपर्क करुन १० टक्के रक्कम देईल, असे साहीरने सांगितले होते. पाडळवे बोल्हेगावमध्ये राहतो.
बांधकाम व्यावसायीक शरद मुथा याच्या पुण्यातील खराडी येथील जमिन विक्रीच्या व्यवहारातील ३ कोटी रुपयांच्या प्रवासी विमा रकमेची लुट करण्याचा हा बनाव होता, असे जरी पोलीसांनी प्राथमिक तपास अहवालात नमुद केले असले तरी ही रक्कम २० कोटीची असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. साहीर हा मुथा याच्याकडे कामास होता, दोघांत कराचीवाला नगरमधील जमिनीच्या व्यवहारातुन वाद होता, त्यातुनच साहीरने हा बनाव रचला, असे पोलीस तपासात समोर येत आहे.
दरम्यान पूर्वी अटक केलेल्या साहीर शेख, भुजबळ, हजारे, इस्ते, शेख वसीम, कादीर खान या सहा जणांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत होती. त्यांना पुन्हा न्यायालयापुढे हजर केल्यावर कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ball firing traveller traveller policyconstuructionbuilder
Show comments